
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला असून युद्धाचा भडका उडाला आहे. दोन्ही बाजूने रणगाडे, तोफांचा वापर केला जात आहे. यामुळे खळबळ उडालेली असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला. ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांचे तोडभरून कौतुक केले आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या युद्धात ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. हा हिंदुस्थानच्या ‘हग्लोमसी’ला अर्थात मिठी मारण्याच्या मुत्सद्देगिरीला मोठा धक्का असून स्वघोषित ‘विश्वगुरू’चा बुरखा फाटल्याची टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्सवर पोस्ट करत केली.
जयराम रमेश यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाचा व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला. अफगाणिस्तानसोबतच्या युद्धात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिलेल्या पूर्ण आणि निःसंदिग्ध पाठिंब्यामुळे हिंदुस्थानच्या ‘हग्लोमसी’ला अर्थात मिठी मारण्याच्या मुत्सद्देगिरीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये झालेल्या आणि पाकिस्तानने पुरस्कृत केलेल्या दहशतवादी हल्ल्यांना ज्या व्यक्तीच्या प्रक्षोभक विधानांची पार्श्वभूमी लाभली होती, त्याच व्यक्तीचे ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आवर्जून कौतुक केले आहे, असे जयराम रमेश म्हणाले.
अमेरिकेसोबतची आपली आर्थिक मुत्सद्देगिरी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. पंतप्रधान मोदींनी अचानक एका बाजूने झुकलेल्या व्यापार करारासमोर शरणागती पत्करली, यावरूनच हे स्पष्ट होते. या करारामध्ये हिंदुस्थानने विशेषतः अमेरिकन शेतकऱ्यांकडून आयात करण्याची ठाम आश्वासने दिली आहेत, तर अमेरिकेने हिंदुस्थानकडून होणाऱ्या निर्यातीला वाव देण्याबाबत केवळ मोघम आश्वासने दिली आहेत. इतकेच नाही तर, हा करार झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच अमेरिकेने हिंदुस्थानकडून येणाऱ्या ‘सोलर मॉड्यूल्स’वर 125.87% आयात शुल्क लागू केले आहे, असेही जयराम रमेश पोस्टमध्ये म्हणाले.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी वारंवार पाकिस्तानी राज्यकर्त्यांशी जवळीक साधल्यामुळे आणि पुन्हा एकदा हिंदुस्थान-पाकिस्तानला एकाच तराजूत तोलण्यास सुरुवात केल्यामुळे आपल्या धोरणात्मक मुत्सद्देगिरीला वारंवार तडाखे बसले आहेत. पंतप्रधान त्यांच्या माध्यमातून विविध पुरस्कार मिळवण्यात यशस्वी होतीलही, परंतु वस्तुस्थिती हीच आहे की, स्वघोषित ‘विश्वगुरू’चा बुरखा फाटला असून जगाला, विशेषतः अमेरिकेला त्यांची खरी क्षमता कळून चुकली आहे, असेही जयराम रमेश यांनी म्हटले.
President Trump’s full-throated and categorical support for Pakistan in its war with Afghanistan is another setback for Indian ‘huglomacy.’
He has once again gone out of his way to praise the man whose inflammatory remarks provided the backdrop to the terrorist attacks in… pic.twitter.com/TuLyt8mzyJ
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) February 28, 2026

























































