
मध्य प्रदेशातील कूनो राष्ट्रीय अभयारण्यात शनिवारी सकाळी नव्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. आफ्रिकेतील बोत्सवाना येथून तब्बल 12 तासांचा प्रदीर्घ विमान प्रवास करून 9 नवे चित्ते हिंदुस्थानात सुखरूप पोहोचले आहेत. या चित्त्यांना विशेष हेलिकॉप्टरद्वारे कूनो येथे आणण्यात आले असून सध्या त्यांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या नव्या आगमनामुळे देशातील चित्त्यांची एकूण संख्या 39 वरून आता थेट 48 वर पोहोचली आहे.
बोत्सवाना येथून आलेल्या या नव्या तुकडीमध्ये 6 मादी आणि 3 नर चित्त्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी आलेल्या चित्त्यांच्या संख्येत नरांचे प्रमाण अधिक होते, मात्र यावेळी मादी चित्त्यांची संख्या जास्त असल्याने तज्ज्ञांनी समाधान व्यक्त केले आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्वतः क्रेटचे हॅण्डल फिरवून या चित्त्यांना क्वारंटाईन भागात मुक्त केले, तर उर्वरित चित्त्यांना वनविभागाच्या प्रशिक्षित पथकाने नियमानुसार त्यांच्या कक्षात हलवले आहे. मादी चित्त्यांचे प्रमाण वाढल्यामुळे भविष्यात प्रजननाचा दर वाढेल आणि चित्त्यांमधील प्रादेशिक संघर्ष कमी होतील, असा विश्वास वन्यजीव तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
या नव्या पाहुण्यांमुळे कूनोमधील 12 महिन्यांहून अधिक वय असलेल्या वयस्कर चित्त्यांचे समीकरणही बदलले आहे. आता कूनोमध्ये एकूण 35 वयस्कर चित्ते झाले असून, त्यात 18 मादी आणि 17 नर चित्ते आहेत. अशा प्रकारे प्रथमच मादी चित्त्यांचे पारडे जड झाले आहे. हे सर्व 9 चित्ते पुढील एक महिना तज्ज्ञांच्या देखरेखीखाली क्वारंटाईन राहतील. या काळात त्यांच्या आरोग्याची, वागणुकीची आणि इथल्या वातावरणाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेची बारकाईने चाचणी केली जाईल. त्यानंतर ‘चीता स्टीयरिंग समिती’च्या निर्णयानुसार त्यांना मुक्त जंगलात सोडण्याबाबत पावले उचलली जातील. प्रत्येक चित्त्याची शिकार करण्याची पद्धत आणि हालचालींवर लक्ष ठेवल्यानंतरच त्यांना निसर्गात मुक्त केले जाईल, असे वन विभागाने स्पष्ट केले आहे.


























































