होळी 2 की 3 मार्चला; जाणून घ्या शास्त्र काय सांगते?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> योगेश जोशी

यंदाची होळी खूप महत्त्वाची मानली जात आहे. यंदा पोर्णिमा 2 आणि 3 मार्च रोजी आली आहे. तसेच यंदा होळीच्या वेळी चंद्रग्रहणही आले आहे. त्यामुळे होलिका दहन 2 मार्च रोजी करायचे की 3 मार्च रोजी याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. आता याबाबत शास्त्रात होलिका दहनाबाबत सांगितलेले नियम आणि होळीकादहन नेमके 2 की 3 मार्चला करायचे याबाबत जाणून घेऊया.

आपल्या पंचागानुसार दरवर्षी फाल्गुन पोर्णिमेला होलिकादहन केले जाते. यंदा पोर्णिमा २ मार्च रोजी सुरू होत असून ३ मार्च रोजी दुपारी संपत आहे. त्यामुळे होलिका दहनाबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. शास्त्रांमध्ये होलिका दहनासाठी काही नियम सांगितले आहेत. असे मानले जाते की प्रदोष काळ, पौर्णिमेच्या दिवशी आणि भद्रा नसलेल्या काळात ही पूजा करणे सर्वात शुभ आहे.

होलिका दहनाबाबत शास्त्रात सांगितलेले नियम

होलिका दहन हे पोर्णिमेच्या दिवशी केले जावे.
होलिका दहन मध्य रात्रीपूर्वी करण्यात यावे.
होलिका दहन करताना प्रदोष काळ असावा.
होलिका दहनाच्या काळात भद्रा असू नये.

शास्त्रात बोलिका दहनाबाबतचे हे चार नियम महत्त्वाचे आहेत. धर्मसिंधूनुसार, होलिका दहन नेहमीच भद्रा नसलेल्या वेळेत केले पाहिजे. २ मार्च रोजी प्रदोष काळात पौर्णिमा आहे. मात्र, त्याचवेळी भद्रादेखील प्रभावी आहे. त्यामुळे हा काळ होलिकादहनासाठी पूर्णपणे शुभ मानला जात नाही. 3 मार्च रोजी भद्रा नाही. त्या दिवशी प्रदोष काळात पौर्णिमा नसली तरी, उदयतिथीनुसार पूर्ण दिवसभर पोर्णिमाच मानली जाते. त्यामुळे शास्त्रात दिलेल्या निमानुसार 3 मार्च हा होलिका दहनासाठी शुभ मानला जात आहे.

भद्रमध्ये होलिका दहन करू नये असे शास्त्रांमध्ये असेही म्हटले आहे. तथापि, योग्य वेळ उपलब्ध नसल्यास, भद्रेचा प्रभाव कमी झाल्यावर त्याच्या शेपटीच्या भागात होलिका दहन करावे, असे शास्त्रात म्हटले आहे. या नियमानुसार २ मार्च रोजी उशीरा रात्री 10 वाजेनंतर होलिका दहन करता येणार आहे. मात्र, शास्त्रांनुसार ३ मार्च रोजी होलिका दहन करणे अधिक योग्य मानले जात आहे.

धर्मसिंधूमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे, शास्त्रांनुसार, प्रदोष काळात पौर्णिमा आणि भद्रा नसलेला काळ होलिका दहनासाठी शुभ मानला जातो. २ मार्च रोजी प्रदोष काळात पौर्णिमा आहे. मात्र, त्या वेळी भद्रा देखील प्रभावी असेल, जो शुभ मानला जात नाही. तर ३ मार्च रोजी भद्रा नाही, परंतु त्या दिवशी प्रदोष काळात पौर्णिमा नाही. मात्र, उदयतिथीनुसार पोर्णिमा मिळत आहे. या सर्व नियमांचा विचार करता, ३ मार्च रोजी भद्रामुक्त काळात होलिका दहन करणे अधिक योग्य ठरेल असे मानले जाते. त्या दिवशी प्रदोषकाळात पोर्णिमा नसली तरी, सूर्योदयावेळी पौर्णिमा असल्याने शास्त्रे त्याला परवानगी देतात.

३ मार्च रोजी संध्याकाळी ६:२४ ते रात्री ८:०० वाजेपर्यंत होलिका दहनासाठी शुभ काळ आहे. मात्र, काही तज्ज्ञांच्या मते २ मार्च रोजी होलिका दहन करणे योग्य आहे. मात्र, शास्त्रात होलिका दहनाबाबत नियम दिले असले तरी स्थळ, काळ, वातावरणानुसार योग्य ते निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य शास्त्रकारांनी दिले आहे. त्यामुळे रुढी, स्थळ, काळ आणि प्राप्त काळानुसार योग्य ते निर्णय घ्यावे, असेही शास्त्रांनी स्पष्ट केले आहे.

यावर्षी पोर्णिमेला चंद्रग्रहणासोबत पंचग्रही योग देखील तयार होत आहे. हिंदुस्थानात चंद्रग्रहण ग्रस्तोदित स्थितीत दिसणार आहे. याचा अर्थ चंद्रोदय होईल, त्यावेळी चंद्र ग्रहण लागलेले असेल. ३ मार्च रोजी चंद्रग्रहण दुपारी ३:२० वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ६:४७ पर्यंत राहील. त्याचा एकूण कालावधी ३ तास ​​२७ मिनिटे असेल. मात्र, होलिका दहन आणि चंद्रग्रहण यांचा संबंध नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. ज्यावेळी होलिका दहन होणार आहे, त्या काळात चंद्र ग्रहण संपलेले असेल, त्यामुळे होलिका दहनाच्या शुभ वेळेवर याचा परिणाम होणार नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले.