
माहीम येथील अदानी समूहाच्या सुरू असलेल्या कामामुळे निर्माण होणारी धूळ आणि तेथील कंत्राटदाराची दादागिरी यावरून आज विधानसभेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार महेश सावंत यांनी हा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडत, या संपूर्ण प्रकरणाची शासनाच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
महेश सावंत यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना सांगितले की, माहीम परिसरात अदानी समूहाचे मोठे काम सुरू आहे. या कामासाठी दररोज दोनशे ते तीनशे ट्रकची अवजड वाहतूक होत असते. या वाहतुकीमुळे संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असून स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव आहे. या धुळीमुळे रस्त्यावरून चालणे कठीण झाले असून, घसरणीमुळे दोन ते तीन दुचाकीस्वार तेथे पडून जखमी झाले आहेत.
परिसरातील वाढत्या अपघातांनंतर स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी जेव्हा संबंधित कंत्राटदाराला जाब विचारण्यासाठी गेले, तेव्हा कंत्राटदाराने सहकार्य करण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली. इतकेच नव्हे तर, या वादादरम्यान स्थानिक नगरसेवकाला मारहाण झाल्याचा खळबळजनक आरोपही सावंत यांनी केला आहे.
या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही महेश सावंत यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले. “पोलिसांनी अदानी समूहाची तक्रार तत्काळ नोंदवून घेतली (FIR), मात्र मारहाण झालेल्या स्थानिक नगरसेवकाची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आली नाही,” असे सावंत यांनी सभागृहात नमूद केले.
माहीममधील जनतेला होणारा त्रास आणि लोकप्रतिनिधीवर झालेला हल्ला ही बाब गंभीर असल्याचे सांगत, राज्य सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि संबंधित कंत्राटदारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी महेश सावंत यांनी केली आहे.

























































