
येत्या मंगळवारी 3 मार्च रोजी खग्रास चंद्रग्रहणानिमित्त प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाचे गाभाऱ्यातील दर्शन दुपारी 3 ते सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत भाविकांना बाहेरून दर्शन घेता येणार असून या काळात श्रीचरणी कोणताही प्रसाद वाहिला जाणार नाही.
खग्रास चंद्रग्रहण हिंदुस्थानातून दिसणार आहे. त्यामुळे या काळात श्री सिद्धिविनायकाचे गाभाऱयातील दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने घेतला आहे. मंगळवारी पहाटे मंदिरात होणाऱ्या पूजा, आरतीच्या वेळेत
कोणताही बदल होणार नाही. तसेच दुपारी श्रींचा नैवेद्य देखील होणार नाही. दुपारी 3 ते सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत गाभाऱ्यातील दर्शन बंद ठेवण्यात येणार असून सायंकाळी 7.30 वाजता धुपारतीनंतर नेहमीप्रमाणे संध्याकाळी 8.45 वाजेपर्यंत भाविकांना गाभाऱ्यातून दर्शन दिले जाणार आहे. रात्री 9 वाजता पूजा झाल्यावर 9.30 वाजता श्रींचा महानैवेद्य व आरती होईल. शेजारती होईपर्यंत दर्शन नियमित सुरू राहील, अशी माहिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे देण्यात आली आहे.




























































