हिंदुस्थानी नौदलात 200 जहाजे येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी नौदलाच्या ताफ्यात 2035 पर्यंत 200 हून अधिक जहाजांचा समावेश करण्याचे लक्ष्य आहे, असा विश्वास नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी व्यक्त केला. 2026 च्या वर्षअखेर 15 अतिरिक्त जहाज सहभागी करण्याची आमची योजना आहे, असेही ते यावेळी म्हणाले. चेन्नई बंदरावर आयएनएस अंजदीपला नौदलाच्या ताफ्यात सहभागी करून घेतल्यानंतर ते बोलत होते.

नौदलाची मोहीम क्षमता हिंद महासागर क्षेत्र आणि त्याच्याही पुढे पसरली आहे. ज्यामध्ये नौदल युनिट्स सतत देखरेख, चाचेगिरी विरोधी मोहीम आणि संयुक्त गस्त घालण्यासाठी तैनात असतात, विश्वासार्ह ऑपरेशनल क्षमता प्रदर्शित केल्या जातात. युद्धनौका आणि जहाज बनवण्यासाठी हिंदुस्थान आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियावर फोकस करत आहेत. सध्या ऑर्डर केलेल्या सर्वच्या सर्व 50 जहाजांची निर्मिती विविध हिंदुस्थानी जहाज निर्माण केंद्रांत सुरू आहे. 2035 पर्यंत 200 हून अधिक जहाजे बनवण्याच्या दिशेने लक्ष्य आहे.

आमचे प्रमुख लक्ष्य हे आत्मनिर्भरतेला वरच्या लेवलपर्यंत घेऊन जाणे आणि 2047 पर्यंत पूर्णपणे आत्मनिर्भर दलाचे निर्माण करण्यावर आहे. या योजनेअंतर्गत 2025 मध्ये हिंदुस्थानी नौदलाने 12 युद्धनौका आणि एका पाणबुडीला नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केले. हाच वेग जारी असून 2026 मध्ये जवळपास 15 अन्य जहाजांना ताफ्यात आणण्याची योजना आहे.

 डॉल्फिन हंटर

आयएनएस अंजदीपला डॉल्फिन हंटर म्हणून ओळखले जाते. समुद्री किनाऱ्यावर शत्रूंच्या पाणबुडीची ओळख पटवणे, त्यांचा पाठलाग करणे, त्यांना नष्ट करणे हे अंजदीपचे प्रमुख काम असणार आहे. चेन्नई बंदरावर आयएनएस अंजदीपला तैनात केले जाणार आहे. अंजदीप हे नाव कर्नाटकाच्या कारवार तट (अरबी समुद्र) च्या जवळ असलेल्या अंजदीप द्वीपच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. हे जहाज 77 मीटर लांब आहे. याचा वेग 25 समुद्री मीलपर्यंत आहे. यात 80 टक्क्यांहून अधिक स्वदेशी उपकरणे वापरण्यात आली आहेत.