
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात होळी उत्सवाचा उत्साह वाढू लागला आहे. सोमवारी होळी पौर्णिमेचा मुहूर्त साधत जागोजागी ‘होलिका दहन’ साजरे केले जाणार आहे. तत्पूर्वी उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. किंबहुना यंदाच्या उन्हाळ्यातील दाहकतेबाबत हवामान खात्याने सावधगिरीचा इशारा दिला आहे. कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रात यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक असेल. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तापमान 37 अंशांच्या पुढे जाईल. तसेच उर्वरित महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पारा 40 ते 46 अंशांची विक्रमी पातळी गाठेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाकडून (आयएमडी) वर्तवण्यात आला आहे.
उष्णता आणि आर्द्रतेत वाढ झाली असून हवामान खात्याने कोकणात बुधवारी येलो अलर्ट जारी केला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे. दरम्यान, पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे मुंबईत तापमानात काही अंशी घट होऊ शकते. या आठवड्यात मुंबईत 35 ते 37 अंश सेल्सिअस तापमान राहिल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

























































