इस्रायली हवाई हल्ल्यात आणखी एक इराणी मंत्री ठार, अनेक गुप्तचर अधिकाऱ्यांचाही मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्रायली संरक्षण दलाने (IDF) इराणविरुद्धच्या युद्धात एक मोठी कारवाई केली आहे. ऑपरेशन रोअरिंग लायन (Operation Roaring Lion) अंतर्गत इस्रायलने तेहरानमधील इराणच्या गुप्तचर मंत्रालयाच्या मुख्य कार्यालयावर थेट हवाई हल्ला केला. या भीषण हल्ल्यात इराणच्या गुप्तचर मंत्रालयाचे अनेक अधिकारी ठार झाल्याचा दावा आयडीएफने केला आहे. सत्तेच्या केंद्रस्थानी झालेल्या या हल्ल्यामुळे इराणमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईत इराणच्या गुप्तचर मंत्रालयातील इस्रायल व्यवहार विभागाचे उपमंत्री सय्यद याह्या हमीदी आणि हेरगिरी विभागाचे प्रमुख जलाल पूर हुसेन यांचा मृत्यू झाला आहे. तेहरानच्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या भागात शिरून केलेल्या या हल्ल्याने इराणच्या सुरक्षा यंत्रणेचे धिंडवडे काढले आहेत.

हा हल्ला केवळ मानवी हानीपुरता मर्यादित नसून, यात इराणच्या गुप्तचर विभागाचे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आणि तांत्रिक यंत्रणाही भस्मसात झाली आहे. अयातुल्ला खामेनी यांच्या निधनानंतर इराण आधीच अंतर्गत अस्थिरतेचा सामना करत असताना, या परकीय हल्ल्याने तिथल्या प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. या घटनेनंतर संपूर्ण मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद झाले असून, इराणकडून कोणत्याही क्षणी प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलने आपल्या देशात हाय-अलर्ट घोषित केला असून लष्कराला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.