
मंगळवारी 3 मार्च रोजी धुलीवंदन असून होळीच्या उत्सवात रंगांची उधळण करताना अनेकदा त्वचेसोबतच केसांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. रंगांमधील रसायनांमुळे केस कोरडे पडणे, तुटणे आणि त्यांची नैसर्गिक चमक जाणे अशा समस्या उद्भवतात. यामुळेच अनेक जण होळी खेळणे टाळतात. मात्र, काही सोप्या टिप्स फॉलो केल्यास रंगांचा आनंद लुटतानाही केसांचे आरोग्य उत्तम राखणे शक्य आहे.
रंगांनी खेळण्यापूर्वी केसांची पूर्वतयारी करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी केसांना नारळ किंवा मोहरीचे तेल लावणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे. तेलाचा थर रंगांना थेट केसांच्या मुळांपर्यंत पोहोचण्यापासून रोखतो, ज्यामुळे केस गळतीची शक्यता कमी होते.
होळी खेळताना केस मोकळे न सोडता ते घट्ट बांधून ठेवावेत. महिलांनी अंबाडा किंवा वेणी घालावी, तर पुरुषांनी डोक्याला स्कार्फ बांधल्यास रंगांचा थेट संपर्क टाळता येतो.
केसांच्या सुरक्षेसाठी रासायनिक रंगांऐवजी सेंद्रिय किंवा नैसर्गिक रंगांचा वापर करण्यावर भर द्यावा.
होळी खेळून झाल्यानंतर केसांची निगा राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. रंग खेळून झाल्यावर केस तसेच न ठेवता कोमट पाणी आणि सौम्य शाम्पूने ते लगेच धुवावेत. यामुळे केसांमधील रंग सहज निघून जातो आणि नुकसान टळते.
दुसऱ्या दिवशीही केसांना तेल लावून काही वेळानंतर ते स्वच्छ धुवावेत, जेणेकरून केसांना आवश्यक पोषण मिळून ते पुन्हा मऊ आणि तजेलदार होतील.
























































