‘कोणीही जाण्याचा प्रयत्न केला तर…’; होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानंतर इराणची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
strait of hormuz closed iran warns to set ships ablaze amid conflict with us israel

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले की, होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पूर्णपणे बंद करण्यात आली असून, तिथून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजावर इराणकडून गोळीबार केला जाईल. इराणी माध्यमांनी हे वृत्त दिले आहे.

शनिवारी इराणने हा निर्यात मार्ग बंद करत असल्याचे जाहीर केले होते, त्यानंतर हा धमकीवजा इशारा देण्यात आला आहे. इराणच्या या पावलामुळे जागतिक तेल वहनाची प्रक्रिया ठप्प होऊन कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची भीती निर्माण झाली आहे.

इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या कमांडर-इन-चीफचे वरिष्ठ सल्लागार इब्राहिम जब्बारी म्हणाले की, ‘होर्मुझची सामुद्रधुनी बंद आहे. जर कोणी तिथून जाण्याचा प्रयत्न केला, तर रिव्होल्युशनरी गार्ड्सचे सैनिक आणि नियमित नौदल त्या जहाजांना आगीच्या भक्ष्यस्थानी पाडतील’.

ही सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाचा तेल निर्यात मार्ग आहे, जो सौदी अरेबिया, इराण, इराक आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या आखाती देशांतील सर्वात मोठ्या तेल उत्पादकांना ओमानचे आखात आणि अरबी समुद्राशी जोडतो.

इराणमधील सत्ताधारी नेत्यांना हटवण्यासाठी २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर हा मार्ग बंद करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी नागरिकांना तेथील धार्मिक नेत्यांना सत्तेतून बेदखल करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते.

याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कतार, कुवेत आणि बहरीन यांसारख्या शेजारील देशांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला, जिथे अमेरिकेचे लष्करी तळ आहेत. तसेच तेहरानने संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि ओमानवरही क्षेपणास्त्रे डागली.

हा मार्ग बंद करून तेहरानने इराण होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याचा बदला म्हणून हा अरुंद जलमार्ग रोखण्याच्या आपल्या जुन्या धमक्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली आहे.

जगातील दैनंदिन तेल वापराचा सुमारे २० टक्के भाग होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जातो, जी तिच्या सर्वात अरुंद बिंदूवर सुमारे ३३ किलोमीटर (२१ मैल) रुंद आहे.

तेहरान आणि त्यांचे जुने शत्रू अमेरिका व इस्रायल यांच्यातील तणावावर जागतिक तेल बाजाराचे लक्ष लागले आहे. या पूर्ण युद्धामुळे जागतिक पुरवठा विस्कळीत होईल आणि प्रदेशात अस्थिरता निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

येमेनमधील इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे जागतिक जहाज वाहतूक आधीच विस्कळीत झाली असताना इराणने हे पाऊल उचलले आहे. २०२३ मध्ये गाझा युद्ध सुरू झाल्यापासून हुथी गटाने लाल समुद्र आणि एडनच्या आखातातील जहाजांना लक्ष्य केले आहे.

strait of hormuz closed: iran warns to set ships ablaze amid conflict with us israel

Iranian revolutionary guards announce closure of strait of hormuz, threatening to attack any ship passing through. know more about its impact on global oil prices and regional stability.