
मध्यपूर्वेतील इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील भीषण युद्धामुळे सध्या जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या युद्धाच्या झळ हिंदुस्थानमध्येही जाणवत आहेत. युद्धाच्या ढगांनी इराण, इस्रायलसोबतच दुबई आणि इतर आखाती देशांना व्यापलं आहे. त्याचे पडसाद सर्वसामान्यांच्या जीवनावर उमटत आहेत. अशातच मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री विशाखा सुभेदार हिचा मुलगा अभिनय सुभेदार हा कुवेतमध्ये अडकला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपला मुलगा तिथे सुरक्षित नसल्याच्या भीतीपोटी विशाखा सुभेदारने एक भावूक व्हिडीओ शेअर करत थेट मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना मदतीचे आवाहन केले आहे.
अभिनय सुभेदार काही दिवसांपूर्वीच लंडनला जाण्यासाठी निघाला होता. हिंदुस्थानातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो पुन्हा उच्च शिक्षणासाठी लंडनला रवाना झाला होता. विशाखा आणि तिचे कुटुंबीय त्याला निरोप देण्यासाठी विमानतळावर गेले होते, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, युद्धाच्या तणावामुळे त्याचे विमान लंडनला न पोहोचता कुवेतमध्येच उतरवण्यात आले. आता तो तिथेच अडकला असून विशाखाचा जीव मुलाच्या काळजीने व्याकुळ झाला आहे.
विशाखा सुभेदारचे कळकळीचे आवाहन
विशाखाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिची अस्वस्थता स्पष्ट दिसत आहे. ती म्हणाली, ‘नमस्कार! मी विशाखा सुभेदार. माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना विनंती आहे की, माझा मुलगा लंडनला जात होता, पण कुवेतमध्ये ‘ले-ओव्हर’ असल्यामुळे त्याचे विमान तिथेच उतरवण्यात आले. एअर स्पेस बंद असल्याने गेल्या चार दिवसांपासून सर्व विमाने रद्द झाली आहेत, हे संपूर्ण देशाला माहीत आहे. माझा मुलगा चार दिवसांपासून कुवेतमध्ये अडकला आहे’.
View this post on Instagram
ती पुढे म्हणाली की, ‘तिथली परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे, हे आपण बातम्यांतून पाहत आहोत आणि तो स्वतः तिथे हे अनुभवत आहे. तिथे हल्ले होत आहेत. सध्या एअरलाईन्स आणि इंडियन एम्बसीने त्यांची हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली आहे. पण आता त्यांना मायदेशी परत आणण्याची व्यवस्था करावी, ही माझी हात जोडून विनंती आहे. जसे दुबईतील लोकांना परत आणले गेले, तसेच कुवेतमधील हिंदुस्थानींनाही सुखरूप घरी आणावे. अनेक मुलांच्या आया आणि कुटुंबीय त्यांची वाट पाहत आहेत. कृपया लवकरात लवकर मार्ग काढावा’.
कलाकारांनी दिला धीर
विशाखाचा हा व्हिडीओ पाहून मराठी कलाकारांनी तिला धीर दिला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने यांनी कमेंट करत म्हटले, ‘काळजी करू नकोस… स्वामींचे नामस्मरण चालू ठेव. आपण सर्व बाजूंनी प्रयत्न करूया, अभिनय सुखरूप घरी येईल. तू खंबीर राहा.’ तर अभिनेत्री नेहा नचिकेतनेही ‘अभिनय सुखरूप परत येईल, तू काळजी नको करू’, असे म्हणत तिला पाठिंबा दिला आहे. सध्या संपूर्ण सिनेसृष्टी आणि चाहते अभिनय सुखरूप परत यावा यासाठी प्रार्थना करत आहेत.
actress vishakha subhedar appeals to pm modi as son stuck in kuwait amid war
marathi actress vishakha subhedar shares an emotional video as her son abhinay subhedar gets stuck in kuwait due to the iran-israel war. she seeks help from cm devendra fadnavis and pm modi.
























































