
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जानेवारी महिन्यात बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार या विषयावर सातत्याने पत्रकार परिषद घेत वेगवेगळे दावे करत आहेत. बुधवारीही त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अजितदादांच्या विमान अपघाताआधी काही लोकांनी बारामती विमानतळाची रेकी केली, असा खळबळजनक दावा केला.
काही लोकांशी बोलण्यावर समजलं आहे की, अजितदादा यांच्या विमान दुर्घटनेआधी विमानतळाची रेकी करण्यासाठी काही लोक आले होते. याचा तपास करण्याची गरज आहे. सीआयडी आणि सीआयबीने यात लक्ष घालावं, असे रोहित पवार म्हणाले. अजित पवारांचा दौरा पूर्वनियोजित नव्हता, तर रात्री ठरला होता. एकूण 90 टक्के इंधन भरलं होत. विमानाचं आयुष्य 85 तास राहिलं आहे असं आपण म्हटलं होतं. पण खरं पाहायचं तर 8000 पर्यंत गेलं होतं. म्हणजे अधिकृत वैधतेपेक्षा 3000 तास इंजिन पुढे गेलं होतं. रनवे 29 सोडून 11 वर लँड करण्याचा प्रयत्न झाला हेदेखील सिद्ध होत आहे. मुख्य पायलट काही बोलत नव्हता हे ट्रान्सक्रिप्टमध्ये दिसत आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले आहे.
एखाद्या व्हीआयपीच्या किंवा कोणत्याही दुर्घटनेचा डोळ्यात तेल घालून तपास करण्याची गरज असते. अपघाता अहवाल बनवताना गडबड, चुका होऊ नये अपेक्षा होती. त्यांनी बारामतीला जिल्हा जाहीर केलं आहे. महापालिका आहे असं दाखवलं आहे. यातून एएआयबीचं गांभीर्य दिसत आहे, असेही रोहित पवार म्हणाले. तसेच पंखा डाव्या बाजूला झुकला होता, पण रिपोर्टमध्ये चुकलं आहे. म्हणजे गोळी कुठे लागली हे विचारलं तर डोक्यात लागली असताना यांनी छातीत लागली असं सांगितलं आहे.
रिपोर्टमध्ये विमान झाडाला धडकल्याची चर्चा असताना, झाडं सांगितली आहेत. अशी कुठली झाडं आहेत ज्यांना धडकून विमान खाली पडलं? विमान प़डलं तिथे झाडं नसून, झुडपालाही स्पर्श झाला नव्हता. झुडपाची उंची आणि विमान पडल्याची उंची मॅच होताना दिसत आहे. द्यायचा म्हणून रिपोर्ट दिला. झाडांवर जबाबदारी टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न यांनी केला आहे, असे रोहित पवार म्हणाले.
मी व्हीएसआर, डीजीसीए विरोधात नाही. जो अपघात झाला ते विमान व्हीएसआरचं होतं. डीजीसीएच्या अंतर्गत तपास सुरू आहे. अॅरो नावाचे कंपनी, कर्मचारी, मालक या सगळ्या गोष्टींमध्ये गेल्याशिवाय खरं कळणार नाही. व्हीएसआर आणि अॅरो यांना मुद्दामून टार्गेट करत नाही. डीजीसीएमधील अधिकाऱ्यांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ताकदवान लोकांच्या मदतीने वाचवण्याचा प्रयत्न होत असेल तर तपास योग्य पद्धतीने होणार नाही. या सर्वांकडे क्रिमिनल आणि तांत्रिक दृष्टीने पाहावं लागणार आहे, असेही रोहित पवार म्हणाले.
























































