ICC T20 Ranking – ‘संकटमोचक’ संजू सॅमसनची ICC क्रमवारीत हनुमान उडी, मॅच विनिंग खेळीने नशीब पालटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा सलामीवीर संजू सॅमसन याने सुपर 8 मधील करो या मरो लढतीत वेस्ट इंडीज विरुद्ध दमदार खेळी करत संघाला सेमीफायनलचे दार उघडून दिले होते. वेस्ट इंडिजविरुद्ध केलेल्या शानदार खेळीनंतर आयसीसी टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत त्याने मोठी झेप घेतली आहे. बुधवारी, 4 मार्च रोजी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीनुसार सॅमसनने तब्बल 25 स्थानांची उसळी घेत 40व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सुपर-8 सामन्यात सॅमसनने नाबाद 97 धावांची अविस्मरणीय खेळी करत हिंदुस्थानला विजय मिळवून दिला होता. संजू सॅमसन याच्या खेळीच्या बळावर हिंदुस्थानने 196 धावांचे आव्हान 5 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले होते. टी20 वर्ल्डकपच्या इतिहासात हिंदुस्थानने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला.

सॅमसनने या लढतीत केवळ 50 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर ही विक्रमी खेळी साकारली होती. समोरून एकामागोमाग एक विकेट्स पडत असतानाही त्याने संयम राखत डाव सावरला आणि संघाला उपांत्य फेरीत पोहोचवले.

अभिषेक अव्वल स्थानावर कायम

वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत सुमार कामगिरी केल्यानंतरही हिंदुस्थानचा सलामीवीर अभिषेक शर्मा अव्वल स्थानावर कायम आहे. पाकिस्तानचा शाहीबजादा फरहान दुसऱ्या क्रमांकावर असून इंग्लंडचा फील सॉल्ट तिसऱ्या स्थानावर आहे.

उपांत्य फेरीत इंग्लंडशी लढत

दरम्यान, हिंदुस्थानचा संघ उपांत्य फेरीत इंग्लंड संघाला भिडणार आहे. मुंबईतील वानखेडे 5 मार्च रोजी मैदानावर हा सामना होणार आहे. या लढतीत विजय मिळवणारा संघ अंतिम फेरीत न्यूझीलंडशी भिडेल. न्यूझीलंडने पहिल्या उपांत्य लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सनी धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली आहे.