
टी-20 विश्वचषकात हिंदुस्थानचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास फारसा गुळगुळीत नव्हता. कधी दमदार तर कधी अडखळणारी कामगिरी करत संघ सेमीफायनलपर्यंत पोहोचला. पण गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलने याला फारसे महत्त्व न देता थेट मुद्यावर बोट ठेवले. ‘सेमीफायनलपर्यंत कसे आलो हे महत्त्वाचे नाही, आता पुढचे दोन सामने कसे जिंकतो हेच खरे महत्त्वाचे,’ असे तो ठामपणे म्हणाला.
गतविजेत्या हिंदुस्थानकडून स्पर्धेत सुरुवातीपासून धडाकेबाज कामगिरीची अपेक्षा होती, मात्र संघाची वाटचाल चढउतारांनी भरलेली राहिली. वेस्ट इंडीजविरुद्धचा सामना तर अक्षरशः करो किंवा मरो ठरला होता. त्या लढतीत कसाबसा विजय मिळवत हिंदुस्थानने उपांत्य फेरी गाठली. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी काही गोलंदाजांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यावर मॉर्केलने स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. समोरच्या संघांतही दर्जेदार खेळाडू असतात. प्रत्येक वेळी प्रतिस्पर्ध्यांना 120-150 धावांत गुंडाळू, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. आम्ही येथे आहोत कारण आम्ही सामने जिंकलेत, असे मॉर्केल म्हणाला.
मॉर्केलने इंग्लंडबद्दलही सावध इशारा दिला. ‘इंग्लंड खूप धूर्त संघ आहे. त्यांच्या फलंदाजीत खोली आहे आणि गोलंदाजीत अनेक पर्याय आहेत. ते बेधडक क्रिकेट खेळतात, त्यामुळे ते खूप धोकादायक ठरू शकतात,’ असेही तो म्हणाला.




























































