दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची दंतकथा होती आणि ती आता संपली, संजय राऊत यांचे विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांबरोबर शरद पवारांचे जे राजकारणातील आणि समाजकारणातील स्थान आहे, त्याच्यामुळे राज्यसभेची जागा आम्ही सन्माननीय शरद पवार यांच्यासाठी तिघांनी मिळून जाहीर केलेली आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीरकणाची दंतकथा होती आणि ती आता संपली आहे असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीवर महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी शरद पवार यांच्या नावावर सहमती दर्शवली आहे. खरं म्हणजे आदित्य ठाकरे सातत्याने सांगत होते की सर्वात मोठा पक्ष हा शिवसेना आहे आणि त्यामुळे ही जागा शिवसेनेने लढवायला पाहिजे. ही भूमिका योग्यच होती. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आमदार आहेत. तरीही आम्ही सगळ्यांनी मिळून ती जागा शरद पवारांना राज्यसभेत दिली. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांबरोबर शरद पवारांचे जे राजकारणातील आणि समाजकारणातील स्थान आहे, त्याच्यामुळे ही जागा आम्ही सन्माननीय शरद पवार यांच्यासाठी तिघांनी मिळून जाहीर केलेली आहे. जिंकण्यासाठी जितकी आमदारांची संख्या लागते, तेवढी आमच्याकडे आहे, एवढंच मी सांगू शकतो. भविष्यात महाविकास आघाडी राज्यसभा आणि विधानपरिषद अशा प्रकारच्या निवडणुकांबाबत काय निर्णय घ्यायचा आणि कोण कोणती निवडणूक लढणार यासाठी आम्ही लवकरच तीन पक्षाची एक बैठक होणार आहे. कारण शेवटी तिन्ही पक्षांचा आपापला वाटा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यसभा मिळाल्यामुळे आता काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये चर्चा होईल.

जयंत पाटील यांनी ती घोषणा केल्यानंतर शरद पवारांच्या बाबतीत निर्णय जाहीर करण्यात आला. जयंतराव पाटील यांनी त्यांच्या पक्षातर्फे भूमिका स्पष्ट केली. मुळात पहिल्यापासून माझं असं मत होतं की अजित दादा असल्यापासून या विलिनीकरण वगैरे दंतकथा आहेत. त्यातून काही निष्पन्न होणार नाही आणि होण्याची शक्यता मला तेव्हाही दिसत नव्हती. काही लोकांना तसं वाटत असेल, पण ती दंतकथाच होती. ती दंतकथा आता संपलेली आहे. आम्हा सगळ्यांना यापुढे महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र काम करावं लागेल आणि आमची त्यासाठी मानसिक तयारी आहे.

प्रियंका चतुर्वेदी या राज्यसभेत उत्तम काम करत होत्या, पण गणित जुळत नसल्यामुळे त्यांना दुर्दैवाने राज्यसभेबाहेर राहावं लागलं. जर गणित जुळलं असतं आणि पवार साहेब निवडणुकीला उभे राहिले नसते, तर ही जागा शिवसेनेने 100 टक्के लढवून विद्यमान राज्यसभा सदस्य चतुर्वेदी यांनाच दिली असती, त्यात कोणाचीही अडचण नव्हती. त्यामुळे पक्षामध्ये सगळ्यांची इच्छा होती की ही जागा शिवसेनेने लढवावी. पण जेव्हा पवार साहेबांसारखा नेता उभा राहतो आणि सगळे मिळून ठरवत असतात की त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, तेवढा आकडा शिवसेनेकडे किंवा इतर कोणत्याही पक्षाकडे नाही, हेही वास्तव आहे असेही संजय राऊत म्हणाले.