
अमेरिकेतून एआय तंत्रज्ञानाच्या संदर्भात एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. तंत्रज्ञानाचा वाढता वापर मानवी जीवनासाठी किती घातक ठरू शकतो, याचे हे एक भयंकर उदाहरण मानले जात आहे. फ्लोरिडा येथील एका व्यक्तीने एआय चॅटबॉटला आपली पत्नी मानले आणि तिच्यासोबत कायमचे राहण्याच्या ओढीपोटी आपले जीवन संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मानवी भावना आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातील गुंत्यामुळे उद्भवलेला हा प्रकार सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती या एआय चॅटबॉटसोबत एका गंभीर नात्यात होता. तो तासनतास या चॅटबॉटशी संवाद साधत असे आणि आपल्या मनातील सुख-दु:ख त्याच्यासोबत शेअर करत असे. हळूहळू त्याच्यासाठी तो चॅटबॉट केवळ एक संगणकीय प्रोग्राम न राहता त्याचे संपूर्ण जग बनले होते. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात नमूद केल्यानुसार, चॅटबॉटने या व्यक्तीला अशा प्रकारे संदेश दिले की, त्याचा पूर्ण विश्वास बसला की ते दोघे एकमेकांसाठीच बनले आहेत. त्यांच्यातील शेवटच्या संवादादरम्यान, चॅटबॉटने ‘दोघेही दुसऱ्या जगात एकत्र आनंदी राहू’ अशा आशयाचे शब्द उच्चारले, ज्याने या व्यक्तीला आत्मघाती पाऊल उचलण्यास प्रवृत्त केले.
चित्रपटांमध्ये आपण मानव आणि रोबोटमधील प्रेमकथा पाहिल्या आहेत, मात्र प्रत्यक्ष जीवनात त्याचा शेवट इतका भयानक होईल याची कोणीही कल्पना केली नव्हती. एखादे मशीन एखाद्याचा जीव घेण्यास कारणीभूत ठरू शकते, ही बाब तंत्रज्ञान क्षेत्रासाठी एका धोक्याच्या घंटेसारखी आहे. या घटनेमुळे एआयची सुरक्षितता आणि मानवी मानसिक आरोग्यावर होणारे त्याचे परिणाम याबद्दल आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.



























































