
बिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाचे रखडलेले पाडकाम मध्य रेल्वे मार्गावर मोठा ब्लॉक न घेता पूर्ण करण्यात येणार आहे. मागील सहा महिने मध्य रेल्वेच्या ब्लॉकच्या प्रतीक्षेत हे काम रेंगाळले आहे. येत्या आठवडाभरात दोन-तीन तासांचे छोटे ब्लॉक घेऊन पाडकाम पूर्ण केले जाणार आहे. लोकल ट्रेन आणि मेल-एक्स्प्रेसची वाहतूक विस्कळीत होऊ न देता हे काम करण्यात येणार असल्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
प्रभादेवी रेल्वे स्थानकातील 112 वर्षे जुन्या एल्फिन्स्टन पुलाच्या जागी वरळी-शिवडी उन्नत मार्गातील डबलडेकर रोड ओव्हर ब्रिज उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ब्रिटिशकालीन पुलाचे पाडकाम करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील कामाला वेग देण्यात आला. तथापि, मध्य रेल्वेच्या मोठय़ा ब्लॉकचा प्रस्ताव लटकला आणि पुलाचा अर्धा सांगाडा हटवण्याचे काम रखडले होते. सुरुवातीच्या 18 तासांवरून 12 तासांपर्यंत ब्लॉक घेण्याइतपत मध्य रेल्वे आणि महारेल यांच्यात बोलणी सुरू होती. त्यातही 12 तासांच्या ब्लॉकला मंजुरी मिळाली नाही. अखेर मध्य रेल्वे मार्गावरही पश्चिम रेल्वेप्रमाणे रात्रीच्या वेळेत दोन-तीन तासांचे छोटे ब्लॉक घेऊनच पुलाचे पाडकाम पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही मध्य रेल्वेच्या हद्दीतील पुलाचे पाडकाम आता वेगाने पूर्ण करणार आहोत. पुढील दोन-तीन दिवसांतच हे काम सुरू केले जाईल, असे ‘महारेल’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जैसवाल यांनी सांगितले.
‘महारेल’ने 12 सप्टेंबरपासून पुलाचे पाडकाम सुरू केले होते आणि पुढील 60 दिवसांत म्हणजेच दोन महिन्यांत पाडकाम करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानुसार मध्य रेल्वेच्या हद्दीतून कामाला सुरुवात केली जाणार होती. मोठय़ा प्रमाणावर लोकल ट्रेन व मेल-एक्स्प्रेसची ये-जा होत असल्याने रेल्वेचा मोठा ब्लॉक मिळवण्याचा प्रयत्न ‘महारेल’ने सुरू ठेवला होता. रेल्वे प्रशासनाच्या त्या मंजुरीच्या प्रतीक्षेत पुलाचे पाडकाम सहा महिने रेंगाळले आहे.



























































