व्यावसायिक गॅस सिलिंडर विक्री बंद, युद्धामुळे होणार खायचे वांदे; एस्मा लागू… एलपीजीचे उत्पादन वाढवण्याचे आदेश जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण युद्धाच्या झळा आता थेट तुमच्या घरापर्यंत पोहोचल्या आहेत. युद्धाचा भडका आणखी तीव्र झाल्यास देशात स्वयंपाकाच्या गॅसचा (एलपीजी) तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. ही परिस्थिती पाहता केंद्र सरकारने ‘एस्मा’चा वापर करत सर्व तेल कंपन्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एलपीजी विक्री केवळ घरगुती वापरासाठी करण्याचे या आदेशात म्हटले असून यामुळे व्यावसायिक वापरासाठी एलपीजी सिलिंडरची विक्री थांबवण्यात आली आहे. आखाती देशांमधील युद्ध स्थितीमुळे वायू पुरवठा प्रभावित होण्याची शक्यता आहे. हा धोका पाहता पेंद्राने आज यासंदर्भात आदेश जारी केले असून त्यानुसार तेल कंपन्या त्यांच्याकडे असलले प्रोपेन आणि ब्युटेन या वायूंचा वापर केवळ एलपीजी उत्पादनांसाठी करतील.

इराण युद्धामुळे देशातील 30 टक्के एलपीजी पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे पेंद्राने एलपीजीच्या वापरावर निर्बंध घातले आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार, सर्व कंपन्यांना प्रोपेन आणि ब्युटेनचा पुरवठा इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांना करावा लागणार आहे. हिंदुस्थानकडे कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणाची जास्त क्षमता आहे. मात्र एलपीजी उत्पादनाची क्षमता कमी आहे. त्यामुळे आता पेंद्राने ‘एस्मा’ कायद्यातील अधिकारांचा वापर केला आहे. प्रोपेन आणि ब्युटेन यांच्या मिश्रणातून एलपीजीचे उत्पादन करण्यात येते. या दोन वायूंचा वापर इतर पेट्रोकेमिकल उत्पादनांसाठीदेखील करण्यास पेंद्राने मनाई केली आहे. देशात 33.2 कोटी घरगुती गॅस सिलिंडरच्या जोडण्या आहेत.

सीएनजी, पीएनजीचे दर वाढणार

युद्धामुळे कतारने एलएनपी प्रकल्प बंद केला आहे. त्यामुळे देशात होणाऱ्या गॅस पुरवठय़ामध्ये तब्बल 40 टक्के कपात झाली आहे. ‘एलएनपी’चा पुरवठाचा बंद झाल्यामुळे सीएनजी आणि पीएनजीचे टंचाई होईल, दरवाढ होऊ शकते.

डिलर्सना सूचना

घरगुती वापराचा गॅस पुरवठा सुरळीत राहण्यासाठी पुण्यातील बीपीसीएलच्या शिक्रापूर इथल्या प्लांटमध्ये आणि चाकणमधील एचपीसीएलच्या प्लांटमध्ये व्यावसायिक वापराचे सिलेंडर देणे थांबवण्यात आले आहे. डीलर्सनी व्यावसायिक वापराच्या सिलिंडरसाठी गाडय़ा पाठवू नयेत अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. परिस्थिती सुधारली की लगेच कळवले जाईल, अशी सूचना डिलर्सना देण्यात आली आहे. सध्या व्यावसायिक सिलिंडरचा दोन दिवस पुरेल एवढाच साठा असल्याची माहिती वितरकांनी दिली.

हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, फूड स्टॉलवर संकट

हॉटेल्स, पॅफे, धाबा, कॅटरिंग सर्विसेस आणि रेस्टॉरंट्स, बेकरी, मिठाईची दुकाने, हॉस्पिटल्स आणि ऑफिस कँटीन्स, सिरॅमिक्स, वस्त्रोद्योग, धातू वितळवणारे, पावडर कोटिंग करणारे कारखाने इत्यादी ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर होतो. सर्वाधिक वापर हा जेवण किंवा खाद्य पदार्थ बनवण्यासाठी होतो. त्यामुळे ज्या ठिकाणी पाईपद्वारे गॅसपुरवठा नाही, ती सर्व हॉटेल्स तसेच रस्त्यावरील छोटे स्टॅल्स, ठेले इत्यादी बंद पडण्याची शक्यता असून यामुळे बेरोजगारीचे मोठे संकट निर्माण होण्याची भीती आहे.