
केडीएमसी निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून येऊनही पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या नगरसेवक मधुर म्हात्रे यांना पक्षाने नोटीस बजावली आहे. ४८ तासांत स्पष्टीकरण द्या, अन्यथा अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा दिल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कल्याणच्या प्रभाग १३ मधील मशाल चिन्हावर मधुर म्हात्रे निवडून आले. मात्र निवडणूक होताच ते गायब झाले. तीन आठवडे ते गायब होते. शिवसेनेने मधुर म्हात्रे बेपत्ता असल्याची पोलीस ठाण्यात तक्रारही दिली. शिवसेनेच्या गट स्थापनेवेळी ते कोकण भवनातही आले नाहीत. पक्षाने वारंवार नोटीस बजावून ते शिवसेनेच्या एकाही मीटिंगला उपस्थित राहिले नाही. महापौर निवडीवेळी ते थेट पालिकेत आले. मात्र शिवसेनेच्या गटासोबत उपस्थित राहिले नाहीत. पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे शिवसैनिकांमध्ये त्यांच्याविरोधात प्रचंड नाराजी आहे. या पाश्र्वभूमीवर कल्याण जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी त्यांना नोटीस बजावली आहे.



























































