
आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर रंगणार आहे. हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघात हा सामना होणार आहे. एकीकडे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना दुसरीकडे वर्ल्डकपमधून बाहेर पडलेल्या संघातील खेळाडूंची मायदेशी परतण्याची धडपड सुरू आहे. परंतु खेळाडूंच्या प्रवासावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे.
आखाती देशांमधील वाढत्या तणावामुळे विमान वाहतुकीवर निर्बंध आले असताना आयसीसीने (ICC) केवळ इंग्लंडच्या संघासाठी विशेष चार्टर्ड विमानाची सोय केल्याचा आरोप दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज डेव्हिड मिलर याने केला आहे. मिलरसह क्विंटन डी कॉक आणि वेस्ट इंडिजच्या संघाचा कोच डॅरेन सॅमी यांनीही याविरोधात आवाज उठवला आहे.
मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे हिंदुस्थानकडून होणारी विमान उड्डाणे विस्कळीत झाली आहेत. यामुळे वेस्ट इंडिज (7 दिवसांपासून) आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ (4 दिवसांपासून) हिंदुस्थानातच अडकून पडले आहेत. वेस्ट इंडिजचा संघ 1 मार्च रोजी हिंदुस्थानकडून, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ 4 मार्चला न्यूझीलंडकडून पराभूत झाला. तर इंग्लंडचा संघ 5 मार्च रोजी हिंदुस्थानकडून पराभूत झाला. मात्र, जे संघ आधी बाहेर पडले ते अजूनही हिंदुस्थानातच उत्तराची वाट पाहत असताना सर्वात शेवटी बाहेर पडलेल्या इंग्लंडच्या संघासाठी आयसीसीने तातडीने चार्टर्ड विमानाची सोय केली. यामुळे इतर संघांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.
डेव्हिड मिलरने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली. हे खूपच मजेशीर आहे की इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेनंतर बाहेर पडतो आणि आज रात्री चार्टर्ड विमानाने घरी रवाना होतो. दुसरीकडे, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू अजूनही कोलकात्यात उत्तराची वाट पाहत आहेत, असे मिलर म्हणाला.

यावर वेस्ट इंडिजचे कोच डॅरेन सॅमी यांनीही प्रतिक्रिया दिली. डेव्हिड, थोडं जोरात बोल म्हणजे मागच्या बाकावर बसलेल्यांना (ICC ला) ऐकू जाईल. त्यावर मिलरने पुढे उत्तर दिले की, आयसीसीला इंग्लंडसाठी विमान बुक करायला वेळ लागत नाही, पण विंडीज सात दिवसांपासून आणि आम्ही चार दिवसांपासून वाट पाहत आहोत.
दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यांनीही आयसीसीच्या या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘विशिष्ट संघांनाच झुकते माप का दिले जात आहे?’ असा सवाल त्यांनी विचारला आहे.
आता मला फक्त घरी जायचंय! हिंदुस्थानात अडकलेल्या डॅरेन सॅमी यांची आर्त हाक



























































