Nishant Kumar Join JDU – नितीश कुमार यांचा मुलगा निशांतची सक्रिय राजकारणात एन्ट्री; JDU मध्ये अधिकृत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेवर जाण्यापूर्वी मोठी राजकीय खेळी खेळली आहे. नितीश कुमार यांनी त्यांच्या मुलाला सक्रिय राजकारणामध्ये उतरवले आहे. रविवारी नितीश कुमार यांचे सुपुत्र निशांत कुमार यांनी सक्रिय राजकारणात पाऊल ठेवले. जनता दल युनायटेड (जदयू) चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय झा यांच्या उपस्थितीत 50 वर्षीय निशांत कुमार यांनी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. प्रदीर्घ काळ प्रसिद्धीझोतातून दूर राहिल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असून नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर ते बिहारचे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

निशांत कुमार यांच्या पक्षप्रवेशावेळी ‘जदयू’ची संपूर्ण ताकद एकवटलेली पाहायला मिळाली. यावेळी केंद्रीय मंत्री ललन सिंह, बिहारचे उपमुख्यमंत्री विजय चौधरी यांच्यासह पक्षाचे खासदार, आमदार आणि वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी निशांत कुमार यांचे पक्षात उत्साहात स्वागत केले.

कार्यकर्ता म्हणून काम करणार!

पक्षप्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना निशांत कुमार भावूक झाले होते. आजपासून मी अधिकृतपणे पक्षाचा एक शिपाई झालो आहे. मी केवळ एक कार्यकर्ता म्हणून जनतेची सेवा करत राहीन. माझ्या वडिलांनी बिहारच्या विकासासाठी जे योगदान दिले आहे, त्याचा विचार मी जनतेपर्यंत पोहोचवेन. त्यांनी घेतलेला राज्यसभेचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक आहे, ज्याचा मी पूर्ण आदर करतो, असे निशांत कुमार म्हणाले.

लोकांची मने जिंकायची!

मला अजून राजकारणात बरेच काही शिकायचे आहे. पक्षाने आणि जनतेने जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे, त्याला मी सार्थ ठरवेन. आज ही केवळ सुरुवात आहे, मला बिहारच्या लोकांची मने जिंकायची आहेत, असेही ते म्हणाले.

बिहार दौर करणार

पक्षासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. निशांत कुमार यांनी केवळ सदस्यत्वच घेतले नाही, तर त्यांनी आता संपूर्ण बिहारचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ते संघटनात्मक बांधणीसाठी मैदानात उतरतील, असे जदयूचे प्रवक्ते आणि आमदार नीरज कुमार यांनी यावेळी म्हटले.