
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून पंजाबमधील भगवंत मान सरकारने राज्यातील महिलांना आनंदाची बातमी दिली आहे. रविवारी विधानसभेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मान सरकारने आपल्या सर्वात महत्त्वाच्या निवडणूक आश्वासनाची पूर्तता करत ‘मुख्यमंत्री मावा-धीयां सत्कार योजना’ जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून आता पंजाबमधील लाखो महिलांच्या बँक खात्यात दरमहा आर्थिक मदत थेट जमा केली जाणार आहे.
वित्तमंत्री हरपाल सिंह चीमा यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार, पंजाबमधील १८ वर्षांवरील प्रत्येक पात्र महिलेला आता दरमहा १,००० रुपये दिले जातील. तसेच सामाजिक न्यायाला अधिक बळकटी देण्यासाठी अनुसूचित जातीतील (SC) महिलांसाठी ही रक्कम १,५०० रुपये प्रति महिना निश्चित करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे ९७ टक्के महिलांना मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.
या योजनेच्या पात्रतेबाबत सरकारने अत्यंत स्पष्ट निकष लावले आहेत. ज्या महिला आयकर भरतात किंवा ज्या सध्या खासदार अथवा आमदार आहेत, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. मात्र सरकारने एक मोठा निर्णय घेत असे स्पष्ट केले आहे की, ज्या महिला आधीच सामाजिक सुरक्षा पेन्शनचा लाभ घेत आहेत, त्यांना ही नवी आर्थिक मदतही मिळत राहील. यामुळे राज्यातील वृद्ध आणि विधवा महिलांना आता दुहेरी आर्थिक आधार मिळणार आहे.




























































