काेंडी फुटणार, शीव रेल्वे पूल 15 ऑगस्टला खुला होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रमुख उड्डाणपुलांपैकी शीव उड्डाणपूल अखेर स्वातंत्र्य दिनी, 15 ऑगस्टला वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मागील जवळपास वर्षभर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. विविध कारणांमुळे रखडलेल्या या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला आहे.

मुंबई महापालिकेने शहरातील उड्डाणपुलांच्या पुनर्बांधणीची कामे हाती घेतली आहेत. त्यापैकी मुंबई सेंट्रल स्थानकाला लागून असलेला बेलासिस उड्डाणपूल काही दिवसांपूर्वीच वाहतुकीला खुला करण्यात आला. त्यापाठोपाठ बहुप्रतीक्षेत शीव उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची तारीख पालिकेच्या पूल विभागाने जाहीर केली आहे.

प्रकल्प खर्च वाढून 49 कोटी 96 लाखांवर

पुलाच्या पोहोच रस्त्याच्या कामात अडथळे आल्यामुळे मूळ बांधकाम पद्धतीत बदल केला गेला. त्यामुळे प्रकल्प खर्चात 7 कोटींची मोठी वाढ होऊन एकूण खर्च 49 कोटी 96 लाखांवर गेला आहे. तथापि, बांधकाम पद्धतीत बदल केल्याने पुलाच्या कामाने वेग घेतला.