Price hike – सफरचंदाच्या दरात वाढ! युद्धजन्य तणावाचा कृषी व्यापारावर परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता कृषी व्यापारावरही दिसू लागला आहे. आखाती देशांशी होणारी आयात-निर्यात विस्कळीत झाल्याने भारतीय कृषिमाल निर्यात अडचणीत आली असून दुसरीकडे इराणमधून येणार्‍या फळांच्या आवकेत घट झाल्याने बाजारभाव वाढले आहेत. विशेषतः इराणी सफरचंदाच्या दरात घाऊक बाजारात लक्षणीय वाढ झाली आहे.

युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांतील काही बंदरे आणि बाजारपेठांमधील व्यवहार मंदावले आहेत. त्यामुळे हिंदुस्थानातून जाणार्‍या कृषिमालाच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर येथे केळी, द्राक्षे, कांदा आणि तांदूळ अशा कृषीमालाचे सुमारे ५०० ते ६०० कंटेनर निर्यातीसाठी प्रतीक्षेत असल्याची माहिती समोर आली आहे. काही कंटेनर आधीच समुद्रमार्गे पाठविण्यात आले असले तरी संबंधित देशांतील बंदरांवर माल उतरविण्यात अडथळे येत आहेत. दीर्घकाळ कंटेनर अडकून राहिल्यास त्यातील नाशवंत माल खराब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे व्यापारी तसेच शेतकर्‍यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा धोका निर्माण झाला आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १२५ ते १५० कोटी रुपयांचा फटका बसू शकतो, अशी माहिती फळांचे निर्यातदार सत्यजित झेंडे यांनी दिली.

आयातीत अडथळे; फळांचे दर वाढले

या तणावाचा परिणाम आयातीवरही झाला आहे. इराणमधून हिंदुस्थानात मोठ्या प्रमाणावर सफरचंद आणि किवी आयात केली जाते. मात्र सध्या जवळपास ८०० ते ९०० कंटेनर माल इराणच्या बंदरांवर अडकून असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून इराणमधून येणारी फळांची आवक लक्षणीयरीत्या घटली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात इराणी सफरचंदाच्या दरात किलोमागे सुमारे ३० ते ४० रुपयांची वाढ झाली असून सध्या ते १५० ते १६० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. किवीच्या १० किलोच्या पेटीचा दरही १४०० ते १५०० रुपयांवरून वाढून १८०० ते १९०० रुपयांपर्यंत गेला आहे.

स्थानिक बाजारात दरघट

निर्यात मंदावल्याने महाराष्ट्रातील केळी, द्राक्षे आणि कांद्याचा मोठा साठा देशांतर्गत बाजारात येऊ लागला आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात या कृषिमालाच्या दरात १० ते २० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. याचा परिणाम शेतकर्‍यांच्या उत्पन्नावर होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

युद्धजन्य परिस्थितीमुळे इराण आणि आखाती देशांशी असलेली आयात-निर्यात विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कंटेनर बंदरांवर अडकून राहिले असून व्यापारी आणि शेतकरी दोघांनाही आर्थिक फटका बसत आहे. प्राथमिक अंदाजानुसार नुकसान १२५ ते १५० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते.

– सत्यजित झेंडे, फळांचे आयात आणि निर्यातदार, मार्केटयार्ड.