
लग्न समारंभात होणारी उधळपट्टी आणि विनाकारण केला जाणारा वारेमाप खर्च थांबवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या वहूर गावामधील महिलांनी विशेष पुढाकार घेतला आहे. लग्नाच्या हळदीतील मटणाची जेवणावळ आणि दारू पार्टीची प्रथा बंद करण्याचा निर्णय महिला मंडळाने जाहीर केला असून तसा एकमुखी ठरावही मंजूर करण्यात आला आहे. गावात या निर्णयाचे जर कुणी उल्लंघन केले तर लग्नकार्यात संबंधित कुटुंबाला कोणतेही सहकार्य केले जाणार नाही, असा इशाराही या महिलांनी दिला आहे. वहूर गावातील महिलांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होते आहे.
वहूर गावातील उगवती वाडी येथे महिला मंडळाची बैठक झाली. या बैठकीत सर्व महिलांनी लग्न समारंभात होणारा अनावश्यक खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार लग्न समारंभात दिला जाणारा बस्ता (कापड आहेर), उटणे व हळदीच्या कार्यक्रमात मटणाचे जेवण आणि दारू पार्टीवर बंदी घालण्यात आली आहे. या प्रथांमुळे लग्न समारंभाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो, तसेच काही वेळा वादाचे प्रसंगदेखील उद्भवतात. त्यामुळे या खर्चिक आणि चुकीच्या पुढाकार घेतला आहे.
प्रथा थांबवण्यासाठी महिला मंडळाने अन्य गावांना दिशादर्शक महिला मंडळाच्या या पुढाकाराचे गावातील ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. लग्न समारंभसाधे, खर्च कमी आणि वादमुक्त व्हावेत, या उद्देशाने घेतलेला हा निर्णय समाजासाठी आदर्श ठरणार आहे. वहूर गावातील महिलांनी घेतलेला पुढाकार हा जिल्ह्यातील अन्य गावांना दिशादर्शक ठरणार आहे. असा निर्णय जिल्ह्यातील इतर गावांनी घ्यावा, अशी प्रतिक्रिया आता सर्वच स्तरांतून उमटू लागली आहे.
आर्थिक अडचणींचा सामना
गावात अनेक वर्षांपासून लग्नात पाहुणे व नातेवाईकांना साड्या आणि कापड देण्याची प्रथा आहे. या बस्त्यासाठी यजमान कुटुंबाला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. साखरपुडा आणि हळद हे कार्यक्रम फार खर्चिक आहेत. अनेक मध्यमवर्गीय कुटुंब कर्ज काढून हे कार्यक्रम करतात. त्यानंतर त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली आहे.





























































