
रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर मात करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयासोबतच हिंदुस्थानी संघ तीन वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा जगातील पहिला संघ ठरला आहे. 2007 आणि 2024 नंतर आता 2026 मध्येही हिंदुस्थानने विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. आपल्याच मायदेशात टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा आणि विजेतेपद पटकावणारा हिंदुस्थान हा पहिलाच संघ बनला असून, हिंदुस्थानने आता इंग्लंड आणि वेस्ट इंडिजलाही मागे टाकले आहे.

मैदानावरील या विजयाचा जल्लोष सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. विशेषतः दिल्ली आणि अहमदाबाद पोलिसांमधील एका मजेशीर पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. जेव्हा टीम इंडियाचे फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करत होते, तेव्हा दिल्ली पोलिसांनी X वर पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी म्हटले की, “प्रिय अहमदाबाद पोलीस, न्यूझीलंडकडून बॉल हरवल्याची तक्रार येऊ शकते, पण त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. आमचे फलंदाज बॉल थेट स्टँडमध्ये पाठवत आहेत.” अहमदाबाद पोलिसांनीही याला तितक्याच मिश्किलपणे उत्तर देत ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्याचे सांगितले.

या संवादात नंतर उत्तर प्रदेश पोलिसांनीही प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी जसप्रीत बुमराहचे कौतुक करत एक मजेशीर रिप्लाय दिला. युपी पोलिसांनी लिहिले की, “आधीची तक्रार:- चेंडू हरवला, नवीन तक्रार: संपूर्ण फलंदाजी टीमच गायब झाली! आम्हाला वाटते की, हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नसून ही बुमराहची जादू आहे.” पोलीस विभागांमधील ही खेळकर वृत्ती आणि मिश्कील संवाद सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान टीम इंडियाच्या या विश्वविक्रमी विजयामुळे टी-20 क्रिकेटमध्ये हिंदुस्थानचे वर्चस्व आता अधिक मजबूत झाले आहे. एका बाजूला खेळाडूंच्या मैदानावरील कामगिरीने इतिहास रचला, तर दुसरीकडे विविध राज्यांच्या पोलीस दलांनी आपल्या अनोख्या शैलीत टीम इंडियाच्या विजयाचा आनंद साजरा करत चाहत्यांची मने जिंकली. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशात उत्सवाचे वातावरण आहे.
संजू सॅमसन ठरला ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’, टीम इंडिया तिसऱ्यांदा विश्वविजेता
























































