
पंजाबमधील तरन तारन शहरात हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. सोया चाप आणि मोमोज खाल्ल्यानंतर 9 वर्षे आणि 6 वर्षाच्या दोन लहान भावंडाचा मृत्यू झाला. दोन्ही शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दोन्ही मुलांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस तपास करत आहेत.
शनिवारी रात्री दोन्ही भावंडांनी वडिलांकडे सोया चाप आणि मोमोज खाण्याचा हट्ट केला. वडिलांनी मुलांचा हट्ट पूर्ण केला. मुलं सोया चाप आणि मोमोज खाऊन झोपी गेले. रविवारी सकाळी वडील मुलांना उठवायला गेले तर दोघेही उठले नाहीत. पालकांनी तात्काळ दोन्ही मुलांना रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दोन्ही मुलांच्या अंगावर लाल, निळे डाग होते. मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. पोलीस सखोल चौकशी करत आहेत.

























































