ठसा – महेंद्र बोहरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप ठाकूर

अनेक क्षेत्रांत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा सोपवला जातो. चित्रपटसृष्टीत अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. त्याप्रमाणे सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील चित्रपट निर्माते राजकुमार बोहरा यांचा मुलगा महेंद्र बोहरा यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकले आणि आपली एक वैशिष्ट्यपूर्ण वाटचाल करत करत आपलं एक स्थान निर्माण केलं, हे होत असतानाच त्यांचा मुलगा करणवीर बोहरा हेदेखील याच मनोरंजन क्षेत्रात आले आणि त्यांनी अभिनय क्षेत्रात वाटचाल सुरू केली. करणवीर बोहरा यांनीच 2 मार्च 2026 रोजी समाज माध्यमावर आपले पिता महेंद्र बोहरा यांचे निधन झाल्याची माहिती दिली. आयुष्यातील प्रत्येक वळणावर त्यांनी आपल्याला साथ दिली. चित्रपटाच्या सेटवर कसे वागायचे हे समजावून सांगितले, असे करणवीर बोहरा यांनी म्हटले होते. आज तेदेखील आपल्यात नाहीत. महेंद्र बोहरा यांचा जन्म 3 जून 1946 रोजी राजस्थानातील जोधपूर येथे झाला. कालांतराने आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. सुरुवातीला अभिनेता म्हणून कारकीर्द करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश प्राप्त झाले नाही.

त्यानंतर त्यांनी मसालेदार मनोरंजक चित्रपट निर्मिती हेच आपले वैशिष्टय़ कायम ठेवले. त्यांनी निर्माण केलेल्या चित्रपटातील ’टक्कर’ (1995) हा चित्रपट विशेष उल्लेखनीय. या चित्रपटात सुनील शेट्टी नायक तर नसिरुद्दीन शाह खलनायक होता. राजीव रॉय दिग्दर्शित ‘मोहरा’ (1994) व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी ठरला असतानाच या दोघांना करारबद्ध करण्यात निर्माता महेंद्र बोहरा आणि दिग्दर्शक भरत रंगाचारी यांना यश प्राप्त झाले होते. त्याच वेळेस मॉडेलिंगकडून चित्रपटसृष्टीत आलेल्या सोनाली बेंद्रेला त्यांनी नायिका म्हणून निवडले. कलात्मक चित्रपटाच्या संस्कृतीत वाढलेल्या नसिरुद्दीन शाहला अशा व्यावसायिक चित्रपटाच्या सेटवर अवघडल्यासारखे वाटू नये म्हणून निर्माता या नात्याने महेंद्र बोहरा यांनी विशेष काळजी घेतली. चित्रपट अगदी वेळेवर पूर्णदेखील झाला; पण चित्रपट प्रदर्शित व्हायच्या दहाच दिवस आधी दुर्दैवाने दिग्दर्शक भरत रंगाचारी याचे ऐन चाळिशीतच निधन झाले. निर्माता म्हणून महेंद्र बोहरा यांना हा धक्का होता, पण त्यांनी कसलीही कसर न ठेवता हा चित्रपट प्रदर्शित केला. महेंद्र बोहरा यांनी याशिवाय ‘तेजा’ (संजय दत्त आणि किमी काटकर), गोपाला (चंकी पांडे आणि शिल्पा शिरोडकर), हमे तुमसे प्यार कितना, मैं हू शेरनी अशा मसाला मिक्स चित्रपटांची सातत्याने निर्मिती केली. प्रामुख्याने निमशहरी भागातील चित्रपट रसिकांची आवड त्यांनी जपली. सातत्याने त्या काळातील लोकप्रिय कलाकारांनी त्यांच्या चित्रपटात भूमिका साकारलीय हे विशेष. हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकारांची पुढची पिढी कार्यरत होताना महेंद्र बोहरा यांनी गुजराती चित्रपट निर्मितीत पाऊल टाकले आणि कमालीच्या सातत्याने गुजराती चित्रपट निर्माण केले. त्यात खरा खरी नो खेल, भक्त प्रल्हाद, भक्त हनुमान, भगवान श्रीकृष्ण इत्यादी चित्रपटांची निर्मिती केली. प्रामुख्याने पौराणिक चित्रपट निर्मितीवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. चित्रपटसृष्टीत चढउतार येत असतात, आपण सतत कार्यरत असावे हा त्यांचा जणू बाणा होता. कायमच सकारात्मक दृष्टिकोनातून वावरत असलेल्या महेंद्र बोहरा यांच्या चित्रपटाच्या सेटवर आम्हा सिनेपत्रकारांना शूटिंग रिपोर्टींगसाठी कायमच आमंत्रण असे आणि मग हसतमुख चेहऱयाने स्वागत केल्यावर गप्पांत रमून आपल्या चित्रपटाबद्दल माहिती देणार हे ठरलेले असायचे.