
एटीएम कार्डद्वारे झालेल्या अनधिकृत व्यवहारांमुळे खात्यातील रक्कम गमावलेल्या एका वृद्ध महिलेला दिलासा देताना ग्राहक तक्रार निवारण आयोगाने बँक ऑफ इंडियाला 5 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच 25 हजार रुपये न्यायालयीन खर्च म्हणून देण्यासही बजावले आहे. वृद्ध आणि अल्पशिक्षित ग्राहकांच्या बाबतीत सेवा पुरवठादारांकडून अपेक्षित असलेली काळजी अधिक प्रमाणात घ्यायची असते असे आयोगाने आदेशात म्हटले आहे.
तक्रारदार 65 वर्षीय गृहिणी असून त्यांचे शिक्षण चौथीपर्यंत झाले आहे. त्यांनी मे 2010 मध्ये बँक ऑफ इंडियामध्ये बचत खाते उघडले होते. घर विक्रीतून मिळालेली रक्कम या खात्यात जमा होती, मात्र काही काळानंतर त्यांच्या खात्यातून एटीएमद्वारे तब्बल 12 लाख 47 हजार 402 रुपये काढण्यात आल्याचे समोर आले. या पैशांतून सोने दागिने, वाईन, टीव्ही संच व इतर वस्तू खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी संबंधित महिलेने बँकेकडून एटीएम कार्ड जारी करताना निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करत ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली, मात्र बँकेने कोणतीही चूक नसल्याचे सांगत, ‘वेलकम किट’मध्ये चेकबुक, एटीएम कार्ड व पिन देण्यात आल्याचे आणि तक्रारदारांनी त्याची पावती दिल्याचे नमूद केले. तसेच अनधिकृत व्यवहार हे तृतीय व्यक्तीच्या गुन्हेगारी कृत्यामुळे झाले असल्याचा दावा बँकेने केला.
z दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आयोगाने नमूद केले की, या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरीही केवळ तृतीय व्यक्तीने गुन्हा केला असे सांगून बँक जबाबदारीपासून मुक्त होऊ शकत नाही. निष्काळजीपणामुळे तक्रारदार महिलेला आर्थिक नुकसान, मानसिक त्रास आणि हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या असल्याचे नमूद करत भरपाई देण्याचे आदेश आयोगाने दिले.






























































