रायगडच्या पायथ्याशी मनसेचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात, राज ठाकरे यांच्या हस्ते सभासद नोंदणीचा शुभारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या पायथ्याशी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20 वा वर्धापन दिन सोहळा मोठय़ा उत्साहात पार पडला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सभासद नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला असून या सोहळय़ासाठी राज्याच्या विविध भागातून कार्यकर्ते उपस्थित होते.

मनसेच्या वर्धापन दिनानिमित्ताने राज ठाकरे यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपतींना अभिवादन केले. तसेच रायगडावरील अन्य ऐतिहासिक वास्तूंनाही त्यांनी भेट दिली. त्यानंतर हिरकणीवाडी येथे वर्धापन दिनाचा सोहळा सुरू झाला. राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच स्वतः अर्ज भरून सभासद नोंदणीचा प्रारंभही केला. राजकारणापलीकडे जाऊन महाराष्ट्र, मराठी भाषा व संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या नागरिकांना या अभियानात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

गुढी पाडव्याच्या सभेत सविस्तर भूमिका मांडणार

राज ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या सोहळ्यात कोणतेही राजकीय भाष्य केले नाही. येत्या 19 मार्च रोजी गुढी पाडव्यानिमित्त शिवतीर्थावर होणाऱया सभेत आपण सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.