
मध्य पूर्वेत इस्रायल इराणमध्ये संघर्ष पेटला आहे. त्यात दुतावासाशी संपर्क न साधता इराण सोडले तर मदत करता येणार नाही अशी सूचना हिंदुस्थानी दुतावासाने हिंदुस्थानी नागरिकांना दिली आहे.
दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इराणमधून बाहेर पडण्यासाठी देशाच्या सीमा ओलांडण्याचा कोणताही प्रयत्न दूतावासाकडून स्पष्ट मार्गदर्शन मिळाल्यानंतरच करावा. “हिंदुस्थानी नागरिकांनी देशाबाहेर जाण्यासाठी इराणच्या कोणत्याही सीमेवर दूतावासाशी आधी संपर्क न करता जाऊ नये,” असे दूतावासाने सांगितले.
इराणबाहेर गेल्यानंतर मदत शक्य नाही
दूतावासाने याबाबतही इशारा दिला आहे की, जर एखादी व्यक्ती इराणमधून बाहेर पडली पण तिसऱ्या देशात प्रवेश मिळाला नाही, तर त्या परिस्थितीत दूतावासाला मदत करणे शक्य होणार नाही. “इराणच्या हद्दीतून बाहेर पडून तिसऱ्या देशात प्रवेश मिळाला नाही, तर अशा परिस्थितीत दूतावास मदत करू शकणार नाही,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दूतावासाने इराणमधील हिंदुस्थानी नागरिकांना आपत्कालीन हेल्पलाइनद्वारे संपर्कात राहण्याचेही आवाहन केले आहे. परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून भारतीयांशी समन्वय साधला जात असल्याचे दूतावासाने सांगितले.


























































