
ICC T20 World Cup 2026 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज डेरिल मिचेल आणि हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह यांच्यात झालेली शाब्दिक चकमक आता अर्शदीपला महागात पडली आहे. आयसीसीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत अर्शदीप सिंहवर दंडात्मक कारवाई केली असून त्याच्या मॅच फीमधील 15 टक्के कपात केली आहे.
अंतिम सामन्यादरम्यान एका चेंडूवर अर्शदीप आणि मिचेल यांच्यात बाचाबाची झाली होती. यावेळी डॅरिल मिचेल प्रचंड संतापलेला पाहायला मिळाला. आयसीसीच्या आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.9 नुसार अर्शदीपला दोषी ठरवण्यात आले आहे. या नियमानुसार, आंतरराष्ट्रीय सामन्यात कोणत्याही खेळाडूने किंवा सपोर्ट स्टाफने चेंडू चुकीच्या पद्धतीने थ्रो करणे, ज्यामुळे कोणाला इजा होऊ शकते, हा गुन्हा मानला जातो. याच गुन्ह्यात अर्शदिप सिंह दोषी आढळला असून त्याची मॅच फीच्या 15 टक्के रक्कम कापली जाणार आहे. तसेच अर्शदीपच्या नावावर एक डिमेरिट अंक जोडला गेला असून मागील 24 महिन्यांत अर्शदीपचा हा पहिलाच डिमेरिट पॉईंट आहे. जर एखाद्या खेळाडूच्या खात्यात 24 महिन्यांच्या आत 4 किंवा त्यापेक्षा जास्त डिमेरिट गुण जमा झाले, तर आयसीसीकडून त्या खेळाडूवर काही सामन्यांची बंदी घातली जाऊ शकते.
या प्रकरणी कोणतीही अधिकृत सुनावणी घेण्याची गरज भासली नाही, कारण अर्शदीप सिंहने मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांनी लावलेले आरोप मान्य केले आहेत. हा लेव्हल 1 चा गुन्हा असल्याने त्यावर ही कारवाई करण्यात आली. दिलासादायक बाब म्हणजे, सामन्यानंतर दोन्ही खेळाडूंमधील वाद मिटला असून त्यांनी हस्तांदोलन करून खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले.



























































