रायगड झेडपीत शिंदे गटाचे कमळाबाईपुढे लोटांगण; सर्वाधिक जागा जिंकल्या तरी अध्यक्षपद भाजप पटकावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत आमचीच सत्ता येणार व अध्यक्ष आमचाच होणार अशी वल्गना करणाऱ्या शिंदे गटाला अध्यक्षपदाने हुलकावणी दिली आहे. भाजप व अजित पवार गटाने सत्तेसाठी मोर्चेबांधणी केल्याने शिंदे गटाची पंचाईत झाली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तेत वाटा मिळावा यासाठी शिंदे गटाने थेट कमळाबाईसमोर लोटांगण घातले. परिणामी जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदे गटाने सर्वाधिक २१ जागा जिंकूनही अध्यक्ष मात्र भाजपचा होणार आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ सदस्यांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान तर ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ५, काँग्रेस २, भाजप १५, अजित पवार गट १६, शिंदे गटाने २१ जागांवर विजय मिळवला. कोणालाही स्पष्ट बहुमत नसल्याने भाजप व अजित पवार गटाने एकत्र येत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या. यांनतर निवडणुकीपूर्वी आमचीच सत्ता असणार व आमचाच अध्यक्ष बसणार अशा वल्गना करणाऱ्या शिंदे गटासमोर सत्तेतील वाट्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी शिंदे गटाने सुरू केल्या होत्या.

मंत्रालयात ठरला सत्तेचा फॉर्म्युला

बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीत रायगड जिल्हा परिषदेत तीनही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार सर्वप्रथम सवा वर्ष भाजपचा अध्यक्ष जिल्हा परिषदेत बसेल हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सर्वाधिक २१ जागा जिंकूनही शिंदे गटावर १५ जागा जिंकणाऱ्या भाजपचा अध्यक्ष स्वीकारण्याची वेळ आली आहे.

पंचायत समितीच्या १३ सभापतींची निवड

रायगड जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया आज राबवण्यात आली. यामधील अजित पवार गट ३, भाजप ४, शेकाप १, शिंदे गटाचे ५ उमेदवार सभापती पदी विजयी झाले. तर दोन पंचायत समितीचे सभापती पद आरक्षणामुळे रिक्त राहिले आहे. तसेच उरण आणि कर्जत या दोन पंचायत उपसभापतीपदी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार विजयी झाले. तर अजित पवार गट ५, भाजप ३, शिंदे गटाने ५ पंचायत समितीचे उपसभापतीपद पटकावले.