
आखाती देशातील युद्धाचे पडसात हिंदुस्थानच्या शेअर बाजारावरही पडत आहेत. इराण, इस्रायल आणि अमेरिकेतील युद्ध आणखी भडण्याची शक्यता निर्माण झाल्याने तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या. याचा परिणाम गुरुवारी शेअर बाजारावरही झाला आणि बाजार उघडताच सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सप्ताहाच्या चौथ्या दिवशी बाजारात सुरुवातीपासूनच पडझड पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 978 अंकांच्या घसरणीसह 75,871 च्या पातळीवर आला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील 275 अंकांनी कोसळून 23,556 च्या एवढ्या निचांकी पातळीवर पोहोचला. सतत होत असलेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये स्वाहा झाले आहेत.
इराणने हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद केली आहे. येथून तेल वाहतूक करणाऱ्या जहाजांना इराण लक्ष्य करत आहे. बुधवारी इराणने दोन मोठ्या तेलवाहू जहाजांवर हल्ला केला. यामुळे या भागातील तणात अत्यंत शिगेला पोहोचला आहे. जगभरातील 20 टक्के तेलाची वाहतूक या भागातून होते, मात्र सध्या येथे युद्धाचे बार उडत असल्याने कच्च्या तेलाच्या दरात तब्बल 9 टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे.
दरम्यान, याचा थेट परिणाम हिंदुस्थानसारख्या तेल आयातदार देशावर झाला असून देशात निर्माण झालेल्या एलपीजी संकटामुळे बाजाराचे मनोबल खचले आहे. केवळ हिंदुस्थानच नव्हे, तर अमेरिका आणि आशियाई बाजारातून मिळालेल्या नकारात्मक संकेतांमुळे हिंदुस्थानी शेअर बाजारात लाल धूर पसरला.
दिग्गज शेअर्सची दाणादाण
बाजारातील या भूकंपामुळे दिग्गज कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. सुमारे 1597 कंपन्यांचे शेअर्स बाजार उघडताच घसरणीसह व्यवहार करत होते. सर्वाधिक फटका झोमॅटो च्या शेअरला बसला आहे. हा शेअर 4.30 टक्के, भारत फोर्ज 4 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 3.20 टक्के, एपीएल अपोलो 2.90 टक्के, सुप्रीम इंडिया 2.74 टक्के, अशोक लेलँड 2.60 टक्के, मारुती 2.25 टक्के, ट्रेंट 2.10 टक्के, इंडिग 2 टक्के आणि आयसीआयसीआय बँक 1.90 टक्के कोसळला. यासह एल अँड टी, कोटक महिंद्रा बँक आणि टाटा मोटर्स यांसारख्या बड्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी विक्री पाहायला मिळाली.

























































