गुजरातच्या डॉक्टरचा वसईत मेडिकल लॅब रिपोर्ट घोटाळा, डॉ. राजेश सोनी याच्यावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातच्या डॉक्टरचा वसईत लॅब रिपोर्ट घोटाळा उघडकीस आला आहे. डॉ. राजेश सोनी असे त्याचे नाव असून वैद्यकीय परवाना रद्द होऊनही तो मेडिकल रिपोर्टवर स्वाक्षऱ्या करायचा. रुग्णांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या सोनी याच्याविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, वसई-विरार महापालिकेने यापूर्वीच सहा संशयास्पद लॅब्स बंद केल्या असून रिपोर्ट घोटाळ्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे धाबे दणाणले आहेत.

वसई-विरार शहरातील सहा खासगी लॅबमध्ये रुग्णांना चुकीचा वैद्यकीय अहवाल दिला जात असल्याचे प्रकरण दोन वर्षांपूर्वी उघडकीस आले होते. या लॅबमध्ये गुजरातमधील एक डॉक्टर राजेश सोनी हा स्वतःच्या स्वाक्षरीने रक्त, मलमूत्र व अन्य तपासण्यांचे अहवाल देत होता. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एमएमसी) 16 नोव्हेंबर 2021 रोजी डॉ. राजेश सोनी याचा वैद्यकीय परवाना निलंबित केला होता. मात्र या निलंबन काळातही सोनी विविध लॅबमधील नमुने तपासणी अहवाल स्वतःच्या स्वाक्षरीने देत होता.

याच त्या वादग्रस्त लॅब

चुकीच्या अहवालामुळे वसई-विरारमधील रुग्णांच्या आरोग्यालाच धोका निर्माण झाला होता. याप्रकरणी पालिकेने श्रीजी पॅथॉलॉजी लॅब, पार्थ डायग्नोस्टीक सेंटर, गेटवेल क्लिनिकल लॅबोरेटरी, ग्लोबल केअर अॅण्ड वेल्फेअर डायग्नोस्टिक सेंटर आणि धन्वंतरी या लॅबचालकांना नोटीस पाठवून त्या बंद करण्याचे आदेश दिले होते. या लॅब सध्या बंद असल्या तरी बेकायेदशीरपणे स्वाक्षरी करणारा डॉक्टर राजेश सोनी आणि सहा लॅबचालकांवर कुठलाही गुन्हा दाखल झाला नव्हता. तो अखेर उशिरा का होईना दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेने विधिमंडळात उठवला होता आवाज

चुकीचा अहवाल व बोगस डॉक्टरच्या सह्यांचे प्रकरण उघडकीस आल्यावर डिसेंबर 2023 मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. सोनीविरोधात कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल निर्देश दिले होते. महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संपत वळवी यांनी डॉ. सोनी यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.