इन्स्टाग्राममध्ये 8 मे पासून होणार नवा बदल; एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड फिचर होणार गायब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम बाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. इन्स्टाग्राममध्ये 8 मे पासून मोठा बदल होणार आहे. मेटाच्या या फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर केली जाणारी खाजगी चॅट्स आता खाजगी राहणार नाहीत. कंपनीने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, इंस्टाग्रामवरील ‘एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड’ चॅट फीचर 8 मे पासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या तारखेनंतर इन्स्टाग्रामच्या डायरेक्ट मेसेज (DM) सेवेत हे सेक्युरिटी फिचर मिळणार नाही.

ही माहिती इन्स्टाग्रामच्या अधिकृत हेल्प पेजवर देण्यात आली असून, त्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, 8 मे नंतर इन्स्टाग्रामवर एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड मेसेजिंगला सपोर्ट दिला जाणार नाही. कंपनीच्या माहितीनुसार, ज्या युजर्सच्या चॅट्समध्ये सध्या हे फीचर सक्रिय आहे, त्यांना याबाबत आधीच नोटिफिकेशन दिले जाईल. तसेच, संबंधित युजर्सना आपला चॅट डेटा डाउनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

एंड-टू-एंड एन्क्रिप्शन म्हणजे काय?

एंड-टू-एंड एन्क्रिप्शन ही एक सुरक्षित तंत्रज्ञान पद्धत आहे. यामध्ये मेसेज पाठवणारा आणि तो प्राप्त करणारा यांच्याशिवाय तिसरी कोणतीही व्यक्ती तो मेसेज वाचू शकत नाही. अगदी प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या कंपनीलाही त्या मेसेजमध्ये प्रवेश मिळत नाही. या प्रक्रियेत मेसेज पाठवताना तो एका ‘कोड’मध्ये रूपांतरित होतो. हा कोड केवळ मेसेज प्राप्त करणाऱ्या व्यक्तीच्या डिव्हाइसवरच डिक्रिप्ट होऊन पुन्हा मूळ स्वरूपात दिसतो. इंस्टाग्रामच्या या निर्णयामुळे युजर्सच्या गोपनीयतेबाबत नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इन्स्टाग्राममध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन डिसेंबर 2023 मध्ये जोडण्यात आले होते. मेटाने व्हॉट्सॲपप्रमाणेच इन्स्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजरसाठी देखील E2EE फीचर रोल आउट केले होते.