PAK Vs BAN – मैदानात सलमान आगाचा रडीचा डाव, ICC ने ताळ्यावर आणत केली कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तानने डकवर्थ लुईस नियमानुसार 128 धावांनी विजय मिळवला असला, तरी हा सामना पाकिस्तानच्या विजयापेक्षा सलमान आगाच्या ‘रन आउट’ वादामुळे अधिक चर्चेत राहिला. नॉन-स्ट्रायकिंग एंडला असताना बांगलादेशचा कर्णधार मेहदी हसन मिराजने सलमान आगाला धावबाद केले. सलमान क्रीझच्या बाहेर असल्याने मिराजने चपळाईने चेंडू यष्टीवर मारला. या घटनेनंतर सलमानने बांगलादेशने ‘खेळभावना’ दाखवायला हवी होती, असे मत व्यक्त केले होते; मात्र मैदानातील त्याच्या वर्तणुकीमुळे तो आता अडचणीत सापडला आहे.

बाद झाल्यानंतर सलमान आगाने संताप व्यक्त करत आपले ग्लव्स आणि क्रिकेटचे साहित्य मैदानात फेकून दिले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) त्याच्या या कृतीची गंभीर दखल घेतली आहे. आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.2 नुसार, क्रिकेटमधील उपकरणे, कपडे किंवा मैदानातील वस्तू रागाच्या भरात फेकणे हा गुन्हा मानला जातो. या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल आयसीसीने सलमानवर कडक कारवाई करत त्याला दोषी ठरवले आहे. या गैरवर्तणुकीसाठी आयसीसीने सलमान आगावर सामन्याच्या मानधनाच्या 50 टक्के दंड ठोठावला असून त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट देखील जोडला आहे. सलमानने आपली चूक मान्य केल्यामुळे या प्रकरणाची अधिकृत सुनावणी करण्याची गरज पडली नाही.