
एलपीजी (गॅस) तुटवड्याबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इंधनाचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले असून पाईपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) वापर वाढवण्यावर भर दिला आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव (मार्केटिंग आणि रिफायनरी) सुजाता शर्मा यांनी सांगितले की, सध्या घरगुती PNG आणि CNG ग्राहकांना पूर्ण पुरवठा होत आहे. तसेच व्यावसायिक एलपीजी विक्रीही काही प्रमाणात पुन्हा सुरू करण्यात आली आहे. “सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. व्यावसायिक एलपीजी ग्राहकांनी PNG कडे वळल्यास परिस्थिती सुधारण्यास मदत होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक पुरवठ्यावर दबाव आणि वाढती मागणी यामुळे विशेषतः हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरिंग व्यवसायात एलपीजी उपलब्धतेबाबत चिंता वाढली आहे. अशा व्यावसायिक आस्थापनांनी PNGचा वापर केल्यास घरगुती ग्राहकांसाठी एलपीजीचा ताण कमी होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरी भागात PNGचा वापर वाढवण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. ग्राहकांना ई-मेल, ग्राहक पोर्टल, कॉल सेंटर किंवा संबंधित सिटी गॅस वितरण (CGD) कंपन्यांमार्फत PNG कनेक्शनसाठी अर्ज करता येणार आहे.
CGD कंपन्यांना संभाव्य ग्राहकांशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, अनेक कंपन्या PNG कडे वळण्यासाठी प्रोत्साहनपर सवलती देत आहेत. दरम्यान, PNG पायाभूत सुविधा जलदगतीने विकसित करण्यासाठी केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवले आहे. 16 मार्च 2026 रोजी पाठवलेल्या या पत्रात प्रलंबित पाइपलाइन अर्जांना ‘डिम्ड परवानगी’ देण्याचे आणि नवीन प्रस्तावांना 24 तासांत मंजुरी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आकारले जाणारे रस्ते दुरुस्ती शुल्क आणि परवानगी शुल्क माफ करण्याचे, पाइपलाइन कामासाठी वेळ आणि हंगामी निर्बंध सैल करण्याचे, तसेच समन्वयासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पाईपद्वारे पुरवला जाणारा PNG हा एलपीजी सिलेंडरच्या तुलनेत अधिक स्थिर पर्याय मानला जातो. त्यामुळे शहरांमध्ये सिटी गॅस वितरण जाळे विस्तारण्यावर सरकारचा भर आहे.
सरकारच्या या धोरणाचा उद्देश इंधन वितरण अधिक सक्षम करणे आणि विशेषतः व्यावसायिक क्षेत्रातील एलपीजीवरील अवलंबित्व कमी करणे हा आहे. घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य देतानाच मागणीचे योग्य व्यवस्थापन आणि व्यावसायिक क्षेत्रात इंधन बदल (fuel switching) हा भविष्यातील तुटवडा टाळण्यासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.




























































