
गारांचा वर्षाव करीत आज सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यांसह आलेल्या गारांच्या पावसाने सांगलीला झोडपून काढले.
संध्याकाळी सातनंतर हवेत एकदम बदल झाला आणि वादळी वारे सुरू झाले. त्यानंतर काही क्षणांतच गारांचा वर्षाव करीत पावसाने हजेरी लावली. हा पाऊस सुमारे तासभर कोसळत होता. सांगली जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांत पावसाने आज हजेरी लावली. दिवसभराच्या उकाडय़ानंतर सायंकाळी आलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. मात्र, अचानक आलेल्या पावसाने अनेकांची त्रिधातिरपीट उडवून दिली. या पावसाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
सोलापूर, दि. 17 (सा. वा.) – सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, वळसंग, सांगवी व कोव्हाळी भागांत आज सायंकाळी तुफान गारपीट झाली. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांसह सायंकाळी गारांसह आलेल्या पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली.
गेल्या आठ दिवसांपासून सोलापूर जिल्ह्याचे तापमान 40 अंशांच्या पुढे असून, प्रचंड उकाडा वाढला आहे. हवामान खात्याने पावसाची शक्यताही वर्तविली होती. आज सायंकाळी सातच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यांसह पावसाला सुरुवात झाली. अक्कलकोट, वळसंग, सांगवी व कोव्हाळी भागांत मोठय़ा प्रमाणात गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले असून, रात्री उशिरापर्यंत ग्रामीण भागात पाऊस पडत होता.




























































