Iran War – लारिजानी यांच्या हत्येनंतर इराणचा जोरदार पलटवार; इस्रायलवर केला क्षेपणास्त्रांचा वर्षाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यपूर्वेतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालली आहे. इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने आता अधिक उग्र वळण घेतले असून, इराणचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी अली लारिजानी यांच्या हत्येनंतर इराणने तीव्र प्रत्युत्तर देत इस्रायलवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले चढवले आहेत. लारिजानी यांच्या मृत्यूनंतर इराणने ‘बदला’ घेण्याची भूमिका स्पष्ट करत इस्रायलवर एकाच वेळी अनेक स्फोटके वाहून नेणारी प्रगत क्षेपणास्त्रे डागली. काही ठिकाणी या हल्ल्यांमुळे मोठे स्फोट झाले असून नागरी भागांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इस्रायलच्या मध्यभागात क्लस्टर बॉम्बसदृश परिणाम दिसून आल्याची माहिती समोर येत आहे.

या संघर्षाची व्याप्ती आता इस्रायलपुरती मर्यादित राहिलेली नाही. कतार, संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया यांसारख्या देशांमध्येही हल्ल्यांचे प्रयत्न झाल्याचे वृत्त आहे. अनेक ठिकाणी हवाई संरक्षण यंत्रणांनी हे हल्ले निष्फळ ठरवले. दरम्यान, बगदाद येथील अमेरिकन दूतावास परिसरातही रॉकेट आणि ड्रोन हल्ल्यांमुळे तणाव वाढला आहे.

इस्रायलने अली लारिजानी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला असून, इराणने त्यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी करत त्यांना ‘शहीद’ घोषित केले आहे. या घटनेला इराणने थेट डिवचले आहे असे मानले असून, त्यानंतर आता हा संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे म्हटले जात आहे. या वाढत्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीवरील तणावामुळे तेलपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असून, जागतिक अर्थव्यवस्थेलाही त्याचा फटका बसू शकतो. ड्रोन हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.