महिलेचं शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातचे रूपाली चाकणकरांकडून पाद्यपूजा, राष्ट्रवादीने केली राजीनाम्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर एका मोठ्या वादात सापडल्या आहेत. महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातची चाकणकर यांनी पाद्यपूजा केल्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आक्रमक पवित्रा घेत चाकणकर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे.

नेमके प्रकरण काय?

अशोक खरात नावाच्या एका भोंदूबाबावर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे अत्यंत गंभीर आरोप आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून, खरातचे तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आले आहेत. अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीसमोर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा नतमस्तक होऊन त्याची पाद्यपूजा करत असल्याचे पाहून सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने रूपाली चाकणकर यांच्यावर नैतिकतेच्या मुद्द्यावरून कडाडून हल्ला चढवला आहे. पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे म्हणाले की, “ज्या पदावर बसून पीडित महिलांना न्याय द्यायचा असतो, त्याच पदावरील व्यक्ती जर अशा नराधम भोंदूबाबाचे पाय धूत असेल, तर महिलांनी कुणाकडे पाहायचे? ही बाब अत्यंत लाजीरवाणी असून चाकणकर यांनी एका क्षणाचाही विलंब न लावता आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.”

याचा व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या आहेत की, “बलात्काराचे आरोप असणाऱ्या अशोक खरतांचे महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा यांचे पाय धुतानाचे व्हिडीओ? खूप वर्ष त्यांना या ओळखतात? त्यांच्या संघटनेवर? त्यावर पदाचा पण उल्लेख. या माणसाची प्रचंड माहिती माझ्यापर्यंत येत आहे. लवकरच खुलासा करेन.”