Dapoli News – ऐतिहासिक दाभोळ बंदराकडे तब्बल १३९८ कासवांची पिल्ले समुद्राकडे सुरक्षितपणे झेपावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दाभोळ गावाच्या समुद्र किनाऱ्यावर  कासवांच्या संवर्धनासाठी एकुण ८३ घरटी संरक्षित केलेली आहेत. या संरक्षित केलेल्या कासवांच्या घरटयात एकुण ८३७२ कासवांची अंडी संरक्षित केलेली आहेत. त्यातील १३९८ पिल्ले सुरक्षितपणे समुद्राच्या पाण्यात सोडण्यात आली.

कासवांच्या एकूण  7  प्रजाती आहेत. त्यापैकी  5 प्रजाती या  आपल्या देशातील सागराच्या किनाऱ्यावर विशेष करून आढळतात. पश्चिम किनारपट्टीचा विचार केल्यास गुजरात व महाराष्ट्र आणि गोवा किना-यावर सागरी कासवं अंडी घालण्यासाठी येतात. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो. त्यापैकी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या माद्या कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात.

निसर्गरम्य आणि शांत समुद्र किनाऱ्यावर थंडीच्या शेवटी अन उन्हाळ्यात अजस्त्र ऑलिव्ह रिडले टर्टल या महाकाय समुद्र कासवाची वीण होते.  दुर्दैवाने या कासवांची आणि त्यांच्या अंडयांची हत्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी काही वर्षापूर्वी होत असे.   त्यामुळे कांदळवन विभागाने कासव मित्रांच्या मदतीने सागरी जैवविविधतेचा महत्वाचा घटक असलेल्या आणि सागरी पर्यावरण स्वच्छ करण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या कासवांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी दापोली आणि मंडणगड तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर कासवांची अंडी संरक्षित करण्याचे महत्त्वाचे काम हाती घेतले . ते काम सध्या उत्तमरीतीने  आणि गतीने सुरू आहे.

कांदळवन परिक्षेत्र अधिकारी  दक्षिण कोकण कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक कासव मित्रांच्या मदतीने  कासव संवर्धन मोहीम उत्तमरीत्या सुरू आहे.