
– यंदाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेसाठी तब्बल 15 मल्लांना वाइल्ड कार्डद्वारे एण्ट्री देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने घेतला आहे. या निर्णयामुळे सिकंदर शेख, शिवराज राक्षे व ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जमदाडे या स्टार कुस्तीपटूंना संधी मिळाल्याने स्पर्धेचा दर्जा आणि रंगत नक्कीच वाढणार आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत गादी विभागासाठी 6, तर माती विभागासाठी 9 अशा एकूण 15 कुस्तीपटूंची विविध जिह्यांसाठी निवड करण्यात आली आहे. या बैठकीत योगेश दोडके, मेघराज कटके, नामदेव बडरे, रवींद्र पाटील, अस्लम काझी आणि नवनाथ घुले यांची उपस्थिती होती. संघाच्या निर्णयानुसार गादी आणि माती या दोन्ही विभागांत वाइल्ड कार्डद्वारे निवड झालेल्या खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येकी 11 हजार रुपये प्रवेश फी भरावी लागली. संबंधित खेळाडूंनी प्रवेश फीची पावती सादर केल्यानंतरच त्यांना स्पर्धेत अंतिम सहभाग देण्यात आला, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस योगेश दोडके यांनी पत्रकाद्वारे दिली.
गादी विभागातील निवड झालेले खेळाडू ः वेताळ शेळके (अमरावती), वैभव माने (पालघर), भगतसिंग खोत (गडचिरोली), शिवराज राक्षे (नांदेड), कालिदास सोलणकर (नंदुरबार), आदित्य मोहोळ (वाशीम).
माती विभागातील निवड झालेले खेळाडू ः ज्ञानेश्वर जमदाडे (अमरावती), संग्राम पंडित पाटील (भंडारा), हर्षद कोकाटे (चंद्रपूर), समीर शेख (गोंदिया), सिकंदर शेख (हिंगोली), संतोष दोरवड (रत्नागिरी), सुबोध पाटील (पालघर), विक्रमसिंह भोसले (गडचिरोली), राहुल सुळ (वाशीम).































































