
वर्सोवा-भाईंदर जोड रस्त्यासाठी 45 हजार मँग्रोव्हज कापले जाणार आहेत, त्याला स्थगिती द्या, मँग्रोव्हजची कत्तल रोखा, अशी मागणी शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत केली.
आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. वर्सोवा-भाईंदर जोड रस्त्यासाठी 45 हजार मँग्रोव्हज कापले जाणार आहेत आणि त्याबदल्यात भाईंदरमध्ये सर्व्हे क्रमांक 342 येथे 13 लाख 70 हजार मँग्रोव्हज लावले जाणार आहेत असे वनखात्याकडून सांगितले गेले. मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी इतक्या मोठय़ा प्रमाणात मँग्रोव्हज लावण्यासाठी जागाच नाही. वनखात्याचे लोक वनमंत्री, सरकार आणि न्यायालयासह सर्वांचीच दिशाभूल करत आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. मँग्रोव्हज कापण्यास बंदी घातली जावी आणि विधानसभा सदस्यांची संयुक्त समिती तिथे नेऊन सत्य परिस्थिती दाखवावी, असे आदित्य ठाकरे म्हणाले.





























































