
2016 साली शिक्षकांना केलेली मारहाण भाजप महापौर रितू तावडे यांच्या चांगलीच अंगलट आली आहे. याप्रकरणी तावडे यांनी मुंबई सत्र न्यायालयात दोषमुक्ततेसाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे महापौरांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्या विरोधात मारहाण प्रकरणाचा खटला चालणार आहे.
वाकोला येथील महापालिकेच्या उर्दू शाळेतील शिक्षिकेची बदली बीकेसीतील दुसऱया विभागात करण्यात आल्याचा जाब विचारण्यासाठी रितू तावडे व इतर सहा जण शाळेत गेले होते. त्यावेळी त्यांनी शाळेत घुसून मुख्याध्यापिका आणि इतर कर्मचाऱयांशी हुज्जत घातली. इतकेच काय, दोन शिक्षकांना कानाखाली मारल्याचा आणि त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी तावडे यांच्याविरुद्ध भादंवि कलम 353 (सरकारी कामात अडथळा), 332 (दुखापत करणे) आणि 504 (शांतता भंग करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तावडे यांनी त्यांच्यावर राजकीय सूडबुद्धीतून खोटे आरोप करण्यात आल्याचा दावा करत सत्र न्यायालयात दोषमुक्ततेसाठी अर्ज केला होता. या अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी झाली. अतिरिक्त न्यायाधीश एम.व्ही. मानथकर यांनी तावडे यांचा अर्ज फेटाळून लावला.
महापौरांचा युक्तिवाद काय?
तावडे यांच्या वतीने हा खटला राजकीय हेतूने दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद करण्यात आला. तसेच आपल्या अशिलाचा कोणताही गुन्हेगारी हेतू नसल्याचा दावा वकिलांकडून करण्यात आला होता. पोलीस ठाण्यात गुन्हा उशिरा दाखल झाल्याचाही मुद्दा न्यायालयात मांडण्यात आला. मात्र न्यायालयाने हे दावे फेटाळून लावले.
न्यायालयाचे निरीक्षण काय?
पीडित शिक्षकांनी तावडे यांचे नाव स्पष्टपणे घेतले असून त्यांनीच मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तसेच इतर साक्षीदारांच्या जबाबांतही त्यांचा सहभाग दिसून येतो. आरोप ठरविण्यासाठी पुरेसा प्राथमिक पुरावा उपलब्ध असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.





























































