मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही – मुख्यमंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय गँगविरोधातील कारवाई तीव्र गतीने सुरू असून कुठल्याही परिस्थितीत मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांनी 12 आरोपींना अटक केली असून ‘मोक्का’सारखा गुन्हा लावण्यात आला आहे. परदेशात पळून गेलेल्या शुभमचा शोध सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबारप्रकरणी शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. मुंबईत वारंवार घडणाऱया अशा घटनांमुळे मुंबईकर, विशेषतः सिने कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिष्णोई गँग ही आता आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑपरेट होतेय. परवा एका आमदाराला धमकावले ही गंभीर बाब आहे. त्यामुळे केवळ सुरक्षा देऊन काही साध्य होणार नाही. आंतरराष्ट्रीय गँगच्या बाबतीत सरकार काय उपाययोजना करणार ते सांगा, असा जाब आमदार सचिन अहिर यांनी विचारला.

त्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) माध्यमातून अनमोल बिष्णोईला अटक केली आहे. काही गुह्यांमध्ये चौकशीसाठी त्याची कस्टडी मुंबईला द्यावी, अशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे केली आहे.