
भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात एका 89 वर्षीय वृद्धेचा उंदराने हात कुरतडल्याने मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जाफर तडकी यांना 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तसेच एका डॉक्टरसह नर्सला निलंबित करण्यात आले आहे. रुग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. स्मिता आडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
मीरा रोड येथील प्लेझंट पार्क परिसरात राहणाऱ्या सुहासिनी माठेकर (89) यांना उपचारासाठी 12 मार्च रोजी भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी 6 वाजता त्यांचा मुलगा आईला भेटण्यासाठी आयसीयूमध्ये गेला असता त्याला बेडवरून एक उंदीर पळून जाताना दिसला. बेडशीट रक्ताने माखलेली होती आणि त्यावर उंदराच्या रक्ताळलेल्या पायांचे ठसे उमटले होते. तपासणी केली असता उंदराने सुहासिनी यांच्या हाताला गंभीररीत्या कुरतडले होते.
दुर्दैवाने सोमवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठाणे जिल्ह्याचे शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला. चौकशीअंती वैद्यकीय अधीक्षक डॉ. जाफर तडकी यांना 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे, तर डॉ. शंतनू कोंडगीर आणि कंत्राटी परिचारिका नमिता भोनर यांना सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे.
शिवसेना, मनसेची निदर्शने
रुग्णालयातील अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेना आणि मनसेने रुग्णालयात जोरदार निदर्शने केली. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक नीलम ढेकण, उपजिल्हाप्रमुख सुभाष केसरकर, शहराध्यक्ष प्रशांत सावंत, तसेच मनसेचे संदीप राणे आणि सचिन पोपळे उपस्थित होते.






























































