मराठी रंगभूमी – नवे वर्ष नव्या वाटा नवी वळणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उभारलेली गुढी जशी नव्या वर्षाच्या आशाआकांक्षांचे प्रतीक असते, तसाच आशावाद मराठी रंगभूमीवरही आज दिसून येतोय. नव्या वर्षाची सकारात्मक सुरुवात करताना मराठी नाटकांच्या बदलत्या प्रवाहाचा आणि नव्या वाटांचा मागोवा घेणे आवश्यक ठरते.

मराठी रंगभूमी ही आपल्या सांस्कृतिक परंपरेचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि जिवंत घटक आहे. काळानुसार बदल स्वीकारत, नव्या पिढीच्या आवडीनिवडी समजून घेत, पारंपरिक कथानकांच्या पलीकडे जाऊन नवनवीन प्रयोग, विषयांची विविधता आणि सादरीकरणातील बदल यामुळे मराठी नाटकांना एक नवीन ओळख मिळतेय. ‘संगीत देवबाभळी’ने आपला स्वतंत्र ठसा उमटवल्यानंतर त्याच गंभीरतेने ‘करुणाष्टके’ या ताज्या नाटकाने रंगभूमी व्यापलीय.

अनेक नामवंत कित्येक वर्षांनी रंगभूमीकडे वळले आहेत. ‘लग्नपंचमी’ नाटकातून स्वप्नील जोशी तब्बल एका तपानंतर परतलाय तर अमृता खानविलकरचे हे पदार्पणाचे नाटक आहे. महेश मांजरेकर आणि सचिन खेडेकर या दिग्गजांनी आपापले पुनरागमन दणक्यात साजरे केले असतानाच त्या दोघांच्या पदार्पणाचे नाटक असलेले भद्रकाली
प्रॉडक्शन्सच्या ‘अफलातून’ या नाटकाचे पुनरुज्जीवन होत असल्याची बातमी निर्माता प्रसाद कांबळी यांनी पोस्ट केली. येत्या वर्षात जर हे नाटक रंगभूमीवर आले तर त्यातील नव्या संचातील कलाकारांबाबत कमालीची उत्सुकता असणार आहे.

गेल्या काही वर्षांत मराठी नाटकांनी आशय आणि विषयांच्या बाबतीत मोठी झेप घेतलीय. केवळ कौटुंबिक नाटय़ किंवा विनोदी सादरीकरणापुरते मर्यादित न राहता सामाजिक प्रश्न, मानसिक आरोग्य, नात्यांमधील गुंतागुंत, स्त्राr-पुरुष समानता आणि अगदी राजकीय वास्तव यावरही ही नाटकं धाडसाने भाष्य करत आहेत. विषयावर थेट बोट ठेवणाऱया ‘भूमिका’सारख्या जबरदस्त नाटकाने याची चुणूक दाखवून दिलीय. काही नव्या नाटकांमध्ये तरुणांच्या करिअरच्या दबावावर, डिजिटल जगामुळे बदललेल्या नात्यांवर आणि एकटेपणाच्या प्रश्नांवर अत्यंत संवेदनशीलपणे प्रकाश टाकला जातोय.

प्रयोगशील रंगभूमी हे आजच्या मराठी नाटकांचे एक मोठे वैशिष्टय़ आहे. लहान जागांमध्ये, प्रेक्षकांच्या अगदी जवळ जाऊन सादर होणारी ‘इंटिमेट थिएटर’ची संकल्पना आता लोकप्रिय होतेय. पारंपरिक रंगमंचाऐवजी कॅफे, गॅलरी किंवा अगदी खुल्या जागांमध्ये नाटक सादर करण्याचे प्रयोगही होत आहेत. यामुळे कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील अंतर कमी होत असून अनुभव अधिक समृद्ध होतोय. सावित्री मेधातुल लिखित आणि मंगेश सातपुते दिग्दर्शित ‘महोगाथा’ हा असाच एक स्मरणीय अनुभव आहे. काही दिग्दर्शकांनी तर एकाच नाटकात मल्टिमीडिया, लाईव्ह म्युझिक आणि डिजिटल प्रोजेक्शनचा वापर करून सादरीकरण अधिक समृद्ध केले आहे. अक्षता आचार्य लिखित ‘ठरलंय Foreverr’ हे असंच एक वेगळ्या वाटेवरचं नाटक आवर्जून बघायला हवं. विनोद रत्नाच्या ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नंतर तंत्रज्ञानाला रंगभूमीवर घेऊन येणारं हे नाटक आहे. तर गाणी, संगीत आणि नृत्य आहे, पण तरीही ते नाटक आहे अशी ‘तोडी मिल फॅन्टसी’ आणि फुलवा खामकरचं ‘एक तिची गोष्ट’ सारखी नाटकं रसिकांसमोर सादर होतायत.

तथापि, या बदलांबरोबरच अनेक अडथळेही आहेत. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे प्रेक्षकसंख्या. चित्रपट, वेब सीरिज आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या वाढत्या प्रभावामुळे नाटकाकडे वळणाऱया प्रेक्षकांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. काही मोजकी नाटकं हाऊसफुल गर्दी खेचत असताना इतर अनेक नाटकांना मात्र प्रेक्षकांची वाट पाहावी लागतेय. यशोमान आपटे आणि रुमानी खरे यांचं ‘लागली पैज’, विस्मय कासारचं ‘एक नातं असंही’ ही नाटकं नेटाने प्रयोग करतायत. डिजिटल माध्यमांकडे वळलेल्या प्रेक्षकांना, विशेषतः तरुण पिढीला रंगभूमीकडे आकर्षित करणे हे मोठं आव्हान आहे. त्याचबरोबर आर्थिक अडचणी, नाटय़गृहांचे वाढलेले भाडे, तांत्रिक खर्च आणि जाहिरातींसाठी लागणारा निधी यामुळे अनेक चांगल्या प्रयोगांना मर्यादा येत आहेत.

अशा परिस्थितीतही रंगकर्मींची जिद्द उल्लेखनीय आहे. कमी साधनांमध्येही दर्जेदार सादरीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न कायम आहे. ‘क्राऊड फंडिंग’, ‘वर्कशॉप्स’ आणि ‘सहभागी निर्मिती’ अशा नव्या मार्गांनी ते आर्थिक अडचणींवर मात करत आहेत. काही तरुण दिग्दर्शक आणि लेखक सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून आपल्या नाटकांची प्रसिद्धी करत आहेत, ज्यामुळे नव्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचणे शक्य होत आहे. तर काही अनुभवी रंगकर्मी कमी बजेटमध्ये नाटक बसवण्याचा पर्याय निवडत आहेत. विश्वास सोहोनी या नाटकातल्या दादा माणसाने बसवलेलं, हंसा वाडकर यांच्या आयुष्यावर आधारित ‘सांगते ऐका’ हा असाच एक दर्जेदार एकपात्री प्रयोग आहे. मानसी कुलकर्णीचा जबरदस्त अभिनय हा या नाटकाचा यूएसपी आहे.

एकूणच, मराठी रंगभूमी सध्या जुन्या परंपरा आणि नवे प्रयोग यांचा समतोल साधत पुढे जातेय. अडथळे असले तरी त्यावर मात करण्याची ताकद आणि इच्छाशक्ती रंगकर्मींकडे आहे. जर हीच जिद्द कायम राहिली तर मराठी रंगभूमी केवळ टिकून राहणार नाही, तर नव्या उंचीवरही पोहोचेल यात शंका नाही.

नव्या मराठी वर्षाच्या आगमनाच्या दिवशीच महेश मांजरेकर लिखित दिग्दर्शित आणि सिद्धार्थ जाधव अभिनीत ‘ऑनिमल’ तसेच सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित या जोडगोळीच्या ‘ही दोस्ती तुटायची नाय’ नव्या नाटकांच्या शुभारंभाचे प्रयोग होताहेत. एकंदरीत हे नवे वर्ष मराठी नाटकांसाठी दणक्यात जाणार आहे. मराठी नववर्षाच्या शुभेच्छा!