
मुंबईतून कोकणसाठी ट्रेन सुरू झाल्या, पण कोकणवासीयांना तिकीट मिळत नाही. कोकण रेल्वेवरील सर्व गाड्यांचा फायदा गोवा, कर्नाटक आणि केरळला होतो. कोकण रेल्वेच्या गाड्यांना मुंबईत पार्किंग मिळत नाही. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याची आग्रही मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभेत केली.
कोकणावरील आपत्कालीन चर्चेत भाग घेताना सुनील प्रभू म्हणाले, कोकण रेल्वेत सर्वाधिक म्हणजे 21 टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. कर्नाटकचा पंधरा टक्के, केरळचा सहा टक्के आणि गोव्याचा सहा टक्के वाटा आहे. पण मुंबईतल्या एखाद्याला कोकण रेल्वेने कोकणात जायचे असेल तर आरक्षणाचा कोटा नसल्याने कोकणवासीयांना तिकीट मिळत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कोकणाला निसर्गाने वरदान दिले आहे. त्यामुळे पर्यटकांना आपण आकर्षित करू शकतो, पण त्यासाठी पायाभूत सुविधांची चांगल्या हॉटेलची गरज आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशचे पर्यटक समुद्र बघायला गोवा किंवा केरळला जातात; पण कोकणात येत नाहीत. त्यासाठी पर्यटन महामंडळाने विशेष कार्यक्रम राबवला पाहिजे, अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली.
कोकणकन्यासाठी शिवसेनेचे आंदोलन
कोकणासाठी 1998मध्ये कोकणकन्या सुरू झाली, पण ती कुर्ला येथून सुरू झाली. ही गाडी मुंबईतून सुरू करण्याची मागणी होती. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यामुळे कोकणकन्या दादरवरून सुरू झाली पाहिजे, अशी भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. तेव्हा रामविलास पासवान रेल्वे मंत्री होते. शिवसैनिकांनी 1998मध्ये हावडा एक्स्प्रेस बंद पाडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोकणकन्या दादरमधून सुरू झाली याची आठवण यावेळी सुनील प्रभू यांनी सांगितली.
कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी पंचवीस हजार कोटी रुपये द्या
कोकणात फळबागा, कृषी उत्पादन आणि पर्यटनाची मोठी क्षमता आहे; पण हवामान बदलामुळे आंबा, काजू, सुपारी व इतर फळबागांना मोठा फटका बसला आहे. म्हणूनच कोकणच्या सर्वांगीण विकासाकरिता दहा वर्षांसाठी पंचवीस हजार कोटी रुपये देण्याची आग्रही मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी केली. सिंधुरत्न योजना आणि आदित्य ठाकरे यांची बीच शॅक योजना लोकांना रोजगार देणारी योजना आहे. ही योजना सरकारने पुनर्जीवित करावी, अशी मागणी जाधव यांनी सरकारकडे केली.
रायगडच्या पिंपळोलीतील नदी पुलाची दुरुस्ती करा
रायगड जिह्यातल्या सुधागड तालुक्यातील पिंपळोली नागाव या गावांना जोडणारा नदी पूल अत्यंत जीर्ण व धोकादायक झाला असून अखेरची घटका मोजणारा हा पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शिवसेना आमदार हारुन खान यांनी आज विधानसभेत केली.































































