
हिंदू नववर्षाचे स्वागत पारंपरिक उत्साहात आणि मराठमोळय़ा थाटात होणार आहे. आज बाजारांत गुढीपाडव्याच्या खरेदीचा उत्साह होता. यंदा गुढीच्या साहित्याचे दर वाढले आहेत. महागाई असूनही बाजारांत खरेदीचा उत्साह आहे. भुलेश्वर, दादर, विलेपार्ले, अंधेरी, बोरिवली, ठाणे अशा अनेक ठिकाणचे मार्केट हाऊसफुल होते.
आवक घटली, गोंड्याने भाव खाल्ला
गुडीपाडव्याच्या खरा मान असतो तो झेंडूच्या फुलांना म्हणजेच गोंडय़ाला. मात्र यंदा गोंड्याने भाव खाल्ला आहे. गेल्या वर्षी 80 रुपये अर्धा किलो असलेला केसरी आणि पिवळा गोंडा यंदा 100 रुपयांपर्यंत पोचला आहे. बाजारपेठेत 20 रुपयांना गोंडय़ाचा वाटा, गोंडा आणि आंब्याच्या पानाचे तोरण 70 रुपये मीटर, गोंडा तुरा आणि आंब्याच्या पानांचे तोरण 30 ते 50 रुपये मीटरप्रमाणे विक्रीला आहे. गोंडा आवक कमी आणि मागणी वाढल्याने दरात वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
आकर्षक लहान गुढ्या
आकर्षक रेडिमेड गुढय़ांची बातच न्यारी असते. या लहान गुढय़ा एक ते दीड फुटापासून सुरू होतात. या गुढय़ा 50 ते 100 रुपयांपर्यंत आहेत. तर दोन ते तीन फुटांपर्यंतच्या गुढय़ा 120 ते 300 रुपयांपर्यंत आहेत. गुढी उभारण्यासाठी लागणाऱया बांबूच्या काठय़ादेखील 50 ते 150 रुपयांपासून विक्रीला आहेत.
गुढीचे साहित्य महागले
या वर्षी गुढीचे साहित्य महागले आहे. गुढी उभारण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजेच आंब्याचा टाळा आणि कडुलिंब जुडी 20 रुपये, हार 50 ते 150 रुपये, गुढी वस्त्र 30 ते 100 रुपये, मोठी साखरेची गाठी 50 रुपये तर छोटी गाठी 30 रुपयाला एक अशा दराने विक्रीला आहेत.
तोरणे सजली…
फुलांच्या तोरणाबरोबरच नावीन्यपूर्ण लोकरीच्या तोरणांनाही मागणी आहे. लोकरीपासून विणकाम करून तयार केलेले तोरण 200 ते 300 रुपये, खणाच्या कपडय़ापासून तयार केलेली तोरणं 200 रुपये तर स्वामी समर्थ व श्री गणेश प्रिंट केलेली तोरणं 400 रुपयांपर्यंत आहेत. आकर्षक तोरणांच्या खरेदीसाठी महिलांची गर्दी होती.
पारंपरिक पेहरावांना मागणी
नववर्ष स्वागताच्या शोभायात्रांमध्ये लोक पारंपरिक पेहरावात सहभागी होतात. बाजारात पारंपरिक दागिने, फेटे, टोप्या, मुलांचे कुर्ते खरेदीची लगबग होती. पारंपरिक फेटे 300 रुपयांपासून तर टोप्या 150 ते 200 रुपयांपासून होत्या.































































